हापूस बागायतदारांची लूट थांबवा, अन्यथा गाठ शिवसेनेशी!​कॅनिंगच्या दरात ५० टक्के कपात;

माजी आमदार बाळ माने यांचा आक्रमक पवित्रा

निसर्गाच्या लहरीपणाने आधीच हतबल झालेल्या कोकणातील आंबा बागायतदारांची आता कॅनिंग कंपन्यांकडून आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व माजी आमदार बाळ माने यांनी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. यावर्षी मोहोर गळती, अवकाळी पाऊस आणि फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना, हंगामाच्या ऐन भरात कॅनिंग कंपन्यांनी आंब्याचे दर निम्म्याने पाडून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या अन्यायाविरुद्ध शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी निवेदन देताना शेतकरी संघटनेचे नेते मा.खासदार राजू शेट्टी देखील उपस्थित होते.

​निवेदनाद्वारे बाळ माने यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले की, रत्नागिरीतील स्थानिक हापूस आंब्याला डावलून कंपन्यांकडून परराज्यातील आंब्याला प्राधान्य दिले जात आहे, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठ पूर्णपणे कोसळली आहे. कंपन्यांचा हा मनमानी कारभार थांबवण्यासाठी कॅनिंगला जाणाऱ्या हापूस आंब्याला किमान ६० रुपये प्रति किलोचा भाव मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, अनेक कंपन्यांनी ‘जीआय’ मानांकनाचे नियम धाब्यावर बसवले असून त्याची तातडीने चौकशी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बागांमध्ये आंब्याची चोरी वाढल्याने रात्री ९ वाजेपर्यंत आंबा खरेदी केंद्रे सुरू ठेवण्याची सवलतही प्रशासनाने द्यावी, असे त्यांनी सुचवले.
​यावेळी बाळ माने यांनी शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनावरही ताशेरे ओढले. पावस (घोपटवाडी) येथे शासकीय ९० टक्के अनुदानातून उभारलेला प्रोसेसिंग युनिट प्रकल्प सध्या पूर्णपणे बंद अवस्थेत असून, तो तात्काळ कार्यान्वित करावा जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी त्यांनी केली. ही लूट आणि अन्याय न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आंबा पट्ट्यात सध्या वातावरण तापले असून, आता प्रशासन आणि कॅनिंग कंपन्या काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रमुख मागण्या

​कॅनिंग हापूसला किमान ६० रुपये प्रति किलो दर मिळावा.
​परराज्यातील आंब्याऐवजी स्थानिक हापूसला प्राधान्य द्यावे.
​घोपटवाडी येथील बंद पडलेला प्रोसेसिंग युनिट प्रकल्प तात्काळ सुरू करावा.
​आंबा चोरी रोखण्यासाठी रात्री ९ वाजेपर्यंत खरेदी सुरू ठेवावी.
​कॅनिंग कंपन्यांच्या ‘जीआय’ (GI Tag) वापराची सखोल चौकशी व्हावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button