श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे अंगारकीनिमित्त ७० हजार भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन


रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंगळवारी (ता. ५) भाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. मे महिन्याच्या सुट्ट्या आणि अंगारकीचा योग यामुळे पहाटे साडेतीन वाजल्यापासूनच गणपतीपुळेत भक्तांचा महासागर लोटला आहे. आज दिवसभरात सुमारे ७० हजार भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतल्याचा अंदाज असून, या माध्यमातून परिसरात सुमारे ८० लाखाची आर्थिक उलाढाल झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गणपतीपुळे मंदिरात आज सकाळी साडेतीन वाजता श्रींची पुजाअर्चा झाल्यानंतर दर्शनाला सुरवात झाली. यावेळी बाप्पाच्या गाभाऱ्यात केलेली आंब्याची आकर्षक आरास, सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. अंगारकीसाठी सोमवारी (ता. ४) सायंकाळपासूनच भाविकांनी हजेरी लावली होती. पश्चिम महाराष्ट्रातील तरुण वर्ग आज सकाळी गणपतीपुळेमध्ये दाखल झाला होता. सकाळच्या सत्रात तुरळक गर्दी होती. मात्र दुपारनंतर दर्शनासाठी रांगाच्या रांगा पहायला मिळाल्या. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस, जीवरक्षक आणि मंदिराचे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. सायंकाळी ४.३० वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांसह मुख्य पुजारी आणि देवस्थानचे ट्रस्टी सहभागी झालेले होते. मंदिर दर्शनासाठी रात्री ११ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले होते.
यात्रोत्सवानिमित्त दिवसभरात दर्शनासाठी सुमारे ७० हजार भाविक आल्याची नोंद मंदिरात झाली. परजिल्ह्यातील पर्यंटकांमुळे गणपतीपुळे मंदिर परिसरातील हॉटेल्स व्यवसायिक, नारळपाणी स्टॉलधारक, फेरीवाले यांच्याकडे खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी होती. त्यामुळे जलक्रीडावाल्यांची चलती होती. पर्यटकांनी नौकानयनाचा आनंद घेतला. अनेकजणं समुद्रस्नानासाठी सरसावलेले होते. मंदिर परिसरात सुमारे ३० ते ४० व्यावसायिकांचे स्टॉल्स होते. दीडशेहून अधिक हॉटेल व लॉजिंग व्यावसायिक आहेत. दिवसभरात त्यांच्याकडून सुमारे ८० लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जयगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १८ पोलिस अधिकारी आणि १८० पोलिस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात होता.
उन्हाच्या कडाक्यामुळे भाविकांना आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास, तातडीच्या उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आलेले होते. त्याचा लाभ ८७ जणांनी घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button