
राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी,विधान परिषदेच्या १६ जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर
राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. विधान परिषदेच्या १६ जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. या जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या आहेत.जून महिन्यात ही निवडणूक होणार असल्याची माहिती आहे. खरं तर गेल्या काही वर्षांपासून ही निवडणूक रखडली होती. मात्र, आता ही निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात घडमोडींना वेग आला आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १८ जून रोजी या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.त्यासाठी २५ मेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तर १ जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. विधान परिषदेच्या ज्या १६ आमदारांच्या जागा भरल्या जाणार आहेत, त्यामध्ये सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद, परभणी आणि संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
महत्त्वाचे म्हणजे या जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. त्यामुळे या जागांसाठी महायुतीत कशा प्रकारे जागावाटप होते. याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचं वर्चस्व आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता आहे. तर शिंदे गट महायुतीत दुसऱ्या मोठ्या क्रमांकाचा पक्ष आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसलाही काही जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याचं चित्र आहे.
कसा आहे निवडणूक कार्यक्रम?
अधिकृत अधिसूचना जारी होणार – २५ मे २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ०१ जून २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्जांची छाननी – ०२ जून २०२६ (मंगळवार)
अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – ०४ जून २०२६ (गुरूवार)
मतदान -१८ जून २०२६ (गुरूवार) (सकाळी ८ ते दुपारी ४)
मतमोजणी – २२ जून २०२६ (सोमवार)




