
रत्नागिरी शहरात नव्याने बसथांबे निश्चित; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाची पावले
रत्नागिरी शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शहरात नव्याने सुरक्षित बसथांबे निश्चित केले आहेत. परिवहन विभाग, पोलीस विभाग आणि खाजगी प्रवासी बस वाहतूकदार यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून हे थांबे निश्चित करण्यात आले आहेत.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक पार पडली. सुट्टीच्या हंगामामुळे मुंबई-पुणे मार्गावरील प्रवासी वाहतूक वाढली असून शहरातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. यावर उपाय म्हणून नवीन बसथांब्यांचे नियोजन करण्यात आले.
नवीन नियोजनानुसार रेल्वे स्टेशन कॉर्नर आणि कुवारबाव येथील थांबा इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर हलविण्यात आला आहे. टीआरपी परिसरातील सावंत हॉटेलजवळील थांबा सुझुकी विघ्नेश्वरा शोरूमसमोर स्थलांतरित करण्यात आला आहे. साळवी स्टॉप येथे मारुती सुझुकी नेक्सा शोरूमसमोर आणि चिरायू हॉस्पिटलसमोरील शेडजवळ थांबे निश्चित करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर येथे बसस्टॉप आणि एचडीएफसी बँकेसमोर, लेन्सकार्ट शोरूमजवळ नवीन थांबा निश्चित करण्यात आला असून मारुती मंदिर येथील थांबा रद्द करण्यात आला आहे. विवेक हॉटेल, शिर्के उद्यान आणि आरडीसी समोरील थांबे कायम ठेवण्यात आले आहेत. रहाटघर बस स्टँड येथील थांबा बसस्थानकाच्या वरच्या बाजूस हलविण्यात आला आहे.
बैठकीत बस वाहतूकदारांना केवळ निश्चित थांब्यांवरच बसेस थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी बसेस टप्प्याटप्प्याने सोडाव्यात, असेही सांगण्यात आले. वाहनांची आवश्यक कागदपत्रे, आपत्कालीन दरवाजा आणि अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.




