मुंबई गोवा महामार्गावर वालोपे येथे भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू


चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून जात असलेल्या दुचाकीला मागून भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. काही काळ महामार्ग रोखण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button