मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी- माजी विद्यार्थी तसेच दोन महाराष्ट्र नेवल यूनिट एनसीसी, रत्नागिरी या कार्यालयामार्फत आयोजित शिबिरामध्ये सहभागी झालेले राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करून देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात १ मे १९६० रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक, शैक्षणिक व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षण घेत आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन केले.

आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे व योगदानाचे कौतुक करण्यात आले. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, सुरक्षित कामाचे वातावरण आणि कौशल्य विकासाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कामगार दिनाचे औचित्य साधून संस्थेतील श्री. सिद्धेश कांबळे यांचा सर्वोत्कृष्ट कार्यालयीन कर्मचारी तसेच श्री. अमर सनगरे यांचा सर्वोत्कृष्ट मजूर कर्मचारी म्हणून त्यांच्या कार्याचा शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह आणि रोख बक्षीस देवून गौरव करण्यात आला.
शेवटी उपस्थित सर्वांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व कामगारांच्या सन्मानासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व यशस्वी आयोजन प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button