जहाजबांधणी प्रकल्पासाठी रत्नागिरी, रायगड व पालघर मध्ये जागेचा शोध


मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील समुद्र आणि खाडी किनारी ‘मुंबई वाॅटर मेट्रो’ प्रकल्प उभारण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यासाठी नाॅर्वे येथील हायके एएस या कंपनी बरोबर एक सामंजस्य करार गुुरुवारी करण्यात आला. एमएमआर क्षेत्रात ठाणे, कल्याण, वसई विरार, मिरा भाईंदर, नवी मुंबई, पनवेल, अलीबाग पर्यंतच्या २१ जलमार्गावर ही जलवाहतूक सुरु करण्याचे नियोजन आहे. या जलमार्गावर लागणारी आधुनिक आणि पर्यावरणपूरक जहाजे बांधणीचा कारखाना राज्यात उभारला जाणार आहे. त्यासाठी दोन हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि पालघर येथे या जहाजबांधणी कारखाना उभारण्यासाठी जागा चाचपणी सुरु झाली आहे.

मुंबईला विस्तीण असा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबई जवळच्या ठाणे, कल्याण, वसई विरार पर्यंत याच समुद्राचा खाडीकिनारा आहे. या जलाशयांचा जलवाहतूकीसाठी वापर करता येईल का याची चाचपणी सागरी मंडळ गेली अनेक वर्षे करीत आहे. या समुद्र व खाडीकिनाऱ्याजवळची पाण्याची पातळी त्यासाठी काही ठिकाणी अडचण ठरत आहे. नवी मुंबई ते मुंबई पर्यंत ही जलवाहतूक सुरु करण्यात आली मात्र जलवाहतूकीचे तिकिट दर प्रवाशांना परवडत नसल्याने ही वाहतूक ठप्प झाली.राज्य सरकारने नाॅर्वे येथील जलवाहतूक तज्ञ कंपनी हायके यांना हा सर्व अभ्यास करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा करार झाला. मुंबईतील वाहतूक कोंडीवर मेट्रो, मोनो नंतर जलवाहतूक हा एक चांगला पर्याय आहे. जलवाहतूकीसाठी २४ टर्मिनल उभारले जाणार असून २१ जलमार्ग सुरु केले जाणार आहेत. ही जलवाहतूक वसई विरार, कल्याण, उरण पर्यंत सुरु केली जाणार असल्याचे प्रस्तावित आहे. या जलमार्गासाठी लागणाऱ्या छोटया मोठी बोटी तयार करण्यासाठी कारखाना सुरु करण्याची तयारी नाॅर्वेच्या या कंपनीने दाखवली आहे. त्यांच्यासाठी रायगड, रत्नागिरी, आणि पालघर या समुद्रकिनारी असलेल्या जिल्हयात जमिनीचा शोध सुरु करण्यात आल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button