एक बाठ, एक आशा” या संकल्पनेतून चळवळ,जिल्हा परिषद गटात ५००० रायवळ आंब्यांची झाडे लावण्याची व्यापक मोहीम राबवावी-जिल्हा परिषद सदस्य.महेंद्र मांडवकर


कोकणातील रायवल आंबा वाचवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान ५००० रायवळ आंब्यांची झाडे लावण्याची व्यापक मोहीम राबवावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अॅड.महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

“एक बाठ, एक आशा” या संकल्पनेतून ही चळवळ राबविण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मांडवकर यांनी कोकणातील रायवळ आंब्यांचे झपाट्याने कमी होत असलेले प्रमाण आणि त्याचा हापूस उत्पादनावर होणारा परिणाम याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

कोकणातील हापूस आंब्याच्या परागीकरणासाठी रायवळ आंबा अत्यंत महत्त्वाचा असून रायवळ झाडांची संख्या घटल्याने हापूस उत्पादनातही मोठी घट होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पूर्वी गावागावांत मोठ्या प्रमाणात रायवळ आंब्यांची झाडे होती मात्र कालांतराने ती कमी होत गेली आणि आज अनेक गावांमध्ये रायवळ आंबा दुर्मिळ झाला आहे. यामुळे हापूस आंब्याचे परागीकरण कमी होणे, उत्पादन घटणे, रोगराई आणि कीड वाढणे अशा समस्या निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मांडवकर यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान ५००० रायवळ आंब्यांची झाडे लावण्याची मोहीम राबविण्यात यावी. पंचायत समिती स्तरावर रोपवाटिका उभारून “एक शेतकरी, पाच झाडे” या उपक्रमांतर्गत मोफत रोपांचे वाटप करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी, रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रायवळ आंब्यांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेमुळे हापूस उत्पादन वाढण्यास मदत होईल, पर्यावरण संवर्धन होईल, भविष्यातील पिढ्यांसाठी स्थानिक जैवविविधता टिकून राहील. तसेच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा होईल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. “५००० झाडे म्हणजे ५००० ऑक्सिजन सिलिंडर” असे म्हणत पर्यावरण संरक्षणासाठीही ही मोहीम महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

रायवळ आंबा संवर्धनासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांनी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा, अशी मागणीही मांडवकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button