
आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र प्रदर्शनात अनिश दातेंच्या अर्कचित्राची निवड
७ ते ९ मे दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे आयोजन
रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संस्था ( कार्टूनिस्टस कंबाईन ट्रस्ट ) आणि युवा संवाद सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्ताने आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रांचे भव्य प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे भरणार असून उद्या (७ मे) सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे. भारतातील नामवंत व्यंगचित्रकारांनी यात भाग घेतला आहे. तब्बल ३९ देशांतील व्यंगचित्रकारांचा यात समावेश असून अमेरिका, इंग्लंड, रशिया , चीन, जपान , स्वीडन, पोलंड, इटली , इंडोनेशिया , मेक्सिको, अर्जेंटिना आदी विविध देशांतील व्यंगचित्रकारांनी पाठवलेली व्यंगचित्रे तसेच अर्कचित्रे प्रदर्शनामध्ये मांडली जाणार आहेत. महाराष्ट्रातून निवडक व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींची निवड करण्यात आली असून यात मूळचे रत्नागिरीकर आणि सध्या मुंबईत असलेले ग्राफिक डिझाइनर, इलस्ट्रेटर/ कार्टूनिस्ट अनीश दाते यांनी पाठवलेल्या अर्कचित्राची निवड झाली आहे.
मोहिनी दिवाळी २०२४ अंकामध्ये प्रख्यात व्यंगचित्रकार आणि हसरी गॅलरी फेम शि. द. फडणीस यांच्या वयाच्या शंभरीनिमित्ताने ‘ हास्यचित्रकाराचे समृद्ध शतक ‘ हा लेख प्रा. मं. गो. राजाध्यक्ष यांनी लिहिला होता. या लेखासाठी अनीश दाते यांनी व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचे त्यांच्या शि. द. शैलीत रेखाटलेले अर्कचित्र प्रसिद्ध झाले होते. या अर्कचित्राची खास निवड प्रदर्शनात झाली आहे.
व्यंगचित्र प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष असून यंदा हे प्रदर्शन ७ , ८ आणि ९ मे या कालावधीत चालणार आहे. त्यात विविध कार्यक्रमांची अनोखी पर्वणी आणि सांस्कृतिक रेलचेल आहे. ७ मे रोजी संध्याकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत उदय मोहिते, वासुदेव बोन्द्रे आणि ८ मे रोजी संध्याकाळी ६.३० ते ८ या वेळेत नीलेश जाधव, नीरज सबनीस हे नामवंत चित्रकार व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिक देणार आहेत. मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास या विषयावर डॉ. प्रविण मस्तूद यांची प्रकट मुलाखत गौरव सर्जेराव आणि धनराज गरड घेणार आहेत. ८ मे रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत ही मुलाखत होणार आहे.
पुणे शहरात जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर कलादालनामध्ये भरणाऱ्या व्यंगचित्र प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत असून कलाकार , कला विद्यार्थी आणि कलाप्रेमी रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




