
मारुती बिर्जे ‘रत्नसिंधू केसरी’ किताबाचा मानकरी
मांडवी समुद्रकिनारी कुस्तीचा थरार
रत्नागिरी: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित ‘रत्नसिंधू केसरी २०२६’ या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरीच्या मारुती बिर्जे याने यश संपादन केले. मांडवी येथील मारुती बिर्जे यांनी स्वप्नील घडशी यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव करत मानाचा ‘रत्नसिंधू केसरी’ किताब आणि चांदीची गदा पटकावली.
मांडवी समुद्रकिनाऱ्यावर पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारुती बिर्जे आणि स्वप्नील घडशी यांच्यात जबरदस्त झुंज पाहायला मिळाली. सुरुवातीपासूनच दोन्ही पैलवानांनी एकमेकांवर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेरच्या क्षणी मारुती बिर्जे यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला चितपट केले. या विजयानंतर मांडवी परिसरात समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
या जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत शंभराहून अधिक लहान- मोठ्या गटातील कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला. केवळ पुरुषांच्याच नव्हे, तर महिला आणि मुलांच्याही स्वतंत्र कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. रत्नागिरीकरांना ६० हून जास्त कुस्तीमधून जिल्ह्यातील कुस्तीपटूंनी कौशल्य दाखवले. डाव प्रतिडावांनी रंगलेली ही स्पर्धा तब्बल ५ तास चालली. या स्पर्धा पाहण्यासाठी रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यातून कुस्तीप्रेमींनी मांडवी समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी केली होती.
भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते विजेत्या मारुती बिर्जेला मानाची चांदीची गदा आणि मानपट्टा प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भारत केसरी शाश्वत मानकर, भाजप जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, स्वानंद रानडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाडेकर, राजू भाटलेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर या सोहळ्याला संदीप ऊर्फ बाबा नाचणकर, समीर टाकळे, विनोद भुरण, शशिकांत मोदी, दादा ढेकणे, शुभम पिसे, संदीप भिसे, राहुल पवार, भाई जठार, ऐश्वर्या जठार, महेंद्र मांडवकर, नगरसेवक अमित विलणकर, नितीन जाधव यांच्यासह रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई पिलणकर, कार्याध्यक्ष चंद्रशेखर केळकर, कार्यवाह सदानंद जोशी आणि आयोजक योगेश मगदूम, शोएब खान, पिंट्या देसाई उपस्थित होते.
रत्नागिरीतील माघी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या भव्य स्पर्धेच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. मांडवीच्या सुवर्ण वाळूत रंगलेल्या या कुस्तीच्या दंगलीने क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.




