मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव, रत्नागिरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी आणि महात्मा जोतीबा फुले यांची 199 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बाबासाहेब हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते आणि त्यांनी समानता, शिक्षण व अधिकारांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील अन्याय, विषमता आणि अस्पृश्यता यांच्याविरुद्ध लढण्यासाठी केला. त्यांनी समाजाला दिलेला सर्वात मोठा संदेश म्हणजे शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. त्यांनी सांगितले की, जोपर्यंत आपण शिक्षित होत नाही, तोपर्यंत आपण आपल्या हक्कांसाठी उभे राहू शकत नाही.
महात्मा जोतिबा फुले, एक महान समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि तत्वज्ञानी होते ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिला आणि दलितांच्या हक्कांसाठी समर्पित केले. १८४८ मध्ये, त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत पुण्यात पहिली मुलींची शाळा स्थापन केली. आजही ज्योतिबा फुले यांचे जीवन आणि त्यांचे विचार समानता आणि सामाजिक सुधारणांसाठी काम करणाऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे बालपण, शिक्षण, स्त्रीविषयक कार्य आणि घटनाकार म्हणून केलेले योगदान यावर प्रभावी मांडणी केली. वक्तृत्व स्पर्धेत हंसीका म्हात्रे (प्रथम), विनायक कांबळे (द्वितीय) व स्वराज खैरमोडे (तृतीय) हे विजेते ठरले.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली तसेच ८ ते १४ एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. डॉ. राकेश जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मयुरी डोंगरे यांनी केले.
महाविद्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button