जांभरूण गावातील तेली वाडी सौर ऊर्जेने उजळली

रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी तालुका आणि जांभरूण शिवसेना शाखेच्या वतीने एका विशेष लोककल्याणकारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जांभरूण गावातील तेली वाडी येथे सौर पथदिवे (सोलर स्ट्रीट लाईट) बसवून या भागातील अंधाराचे साम्राज्य दूर करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर विजेची समस्या अनेकदा भेडसावत असते. हीच अडचण ओळखून शिवसेनेने सौरऊर्जेचा पर्याय निवडला. या सौर पथदिव्यांमुळे आता तेली वाडीतील रस्ते रात्रीच्या वेळी प्रकाशमय होणार असून, याचा मोठा फायदा स्थानिक ग्रामस्थांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना होणार आहे.
या उपक्रमासाठी शिवसेना सचिव विनायक राऊत व उपनेते बाळ माने यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा लोकहितकारी प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आला.
या सौर पथदिव्यांचे लोकार्पण नुकतेच एका छोटेखानी कार्यक्रमात रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हेच शिवसेनेचे ध्येय आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून शाश्वत विकासाकडे टाकलेले हे एक पाऊल आहे.”
या कार्यक्रमाला जांभरूण शाखाप्रमुख विनोद साळुंखे, काळबादेवी उपशाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या साक्षी साळुंखे, तसेच स्थानिक ग्रामस्थ मुकुंद साळुंखे व संदीप साळुंखे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अनेक वर्षांची प्रकाशाची गरज पूर्ण झाल्यामुळे तेली वाडीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. शिवसेनेच्या या कार्यतत्परतेबद्दल आणि सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button