
जयगड-निवळी मार्गावर अवजड वाहन बंद पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड-निवळी मार्गावरील कळझोंडी फाटा नं.१ येथे काल (१७ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास अवजड वाहन रस्त्यातच बंद पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
तालुक्यातील निवळी ते जयगड मार्ग हा नेहमीच दिवसरात्र वाहतुकीचा वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर जिंदाल एनर्जी, पोर्ट आणि आंग्रे पोर्टवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. याबरोबरच बाकी नियमित वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होत असते. या मार्गावर अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेली (ओव्हरलोड) वाहने ही वळण, चढावात बंद पडतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. याबाबत अनेकदा स्थानिक ग्रामस्थांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) तक्रारी दिल्या आहेत. मात्र या विभागाने त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही.
यापूर्वीही ओव्हरलोड वाहने अती वेगाने पळत असताना अनेक अपघात घडले असून, यात निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास जयगड- निवळी मार्गावर कळझोंडी फाटा नं.१ जवळच अवजड वाहन बंद पडले. या वाहनाने हा पूर्ण रस्ताच व्यापला असल्याने वाहतुकीला ये- जा करण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे स्थानिकांबरोबर येथे येणाऱ्या पर्यटकांचीही मोठी गैरसोय झाली. या घटनेकडे आरटीओ विभाग आतातरी गांभीर्याने पाहील का, असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहेत.




