
64 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यावर्षी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 64 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यावर्षी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे दिनांक 2 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होत आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील 24 केंद्र आणि गोवा राज्यातील एका केंद्रावरील संपन्न झालेल्या प्राथमिक फेरीत पारितोषिक प्राप्त विजेत्या नाटकांची अंतिम फेरी गेल्या 63 वर्षात प्रथमच रत्नागिरी येथे होत आहे.
या स्पर्धाकालावधीत एकूण 47 उतमत्तोम नाट्य कलाकृतींचा आस्वाद रत्नागिरीतील नाट्यरसिकांना घेता येणार आहे.
स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 7.00 वाजता मान्यवर अतिथींच्या हस्ते होणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभाग सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदयजी सामंत साहेब यांच्या प्रयत्नांमुळे तसेच अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांच्यासह रत्नागिरी तमाम नाट्य रसिकांच्या विनंतीमुळे 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरी येथे संपन्न होत आहे.
स्पर्धा कालावधीत दररोज सकाळी 11.30 वाजता आणि सायंकाळी 7.30 वाजता स्पर्धेतील नाटकांचे सादरीकरण होणार असून स्पर्धा कालावधीत रत्नागिरीतील तमाम नाट्यसिकांनी या नाट्य पर्वणीचा आस्वाद घ्यावा आणि प्रत्येक नाट्यप्रयोगाला आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक यांनी केले आहे.




