मत्स्यप्रेमींना महागाईची झळ, पापलेट तब्बल १६०० रुपये किलो


निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या महिनाभरापासून रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना मासळीचा दुष्काळ जाणवत असून, मासेमारीवर अवलंबून असलेले शेकडो कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. समुद्रात निर्माण झालेल्या जोरदार वार्‍यांमुळे मच्छीमार नौका समुद्रात जाण्यासही धजावत नसल्याने संकट अधिकच गडद झाले आहे. त्यामुळे मासळीचे दर वधारले असून, चांगल्या दर्जाच्या पापलेटचे दर तब्बल १६०० रुपये किलो इतके आहेत.
पौर्णिमेच्या आधी व नंतर काही दिवस मासळी स्थलांतरित होते, हा मच्छीमारांचा नेहमीचा अनुभव आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला मासेमारीतून खर्चाइतकीही मासळी मिळत नव्हती. हा परिणाम ओसरत असतानाच समुद्रात अचानक जोरदार वारे सुरू झाले. या वार्‍यांमुळे समुद्रात टाकलेली मासेमारीची जाळी गुरफटून तुटू लागली. आधीच मासळीचे प्रमाण कमी असताना जाळ्यांची दुरुस्ती आणि नव्याने जाळी खरेदीचा खर्च मच्छीमारांच्या अंगावर पडू लागला. परिणामी अनेक नौका अर्ध्यावरच मासेमारी सोडून पुन्हा बंदरात परतण्याचे प्रमाण वाढले आहे.
नौकांचे इंधन, नौकेवरील खलाशी व कामगारांचे रेशन, बर्फ, पाणी आदी विविध खर्च करूनही त्याच्या तुलनेत मिळणारी मासळी अत्यंत अपुरी असल्याचे मच्छीमार सांगतात. खर्च वसूल होत नसल्याने जेवढी मासळी मिळते ती चढ्या दराने विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. याचा थेट परिणाम मच्छीमार बाजारावर दिसून येत असून, रविवारी प्रमुख मच्छीमार्केटमध्ये खवय्यांची लक्षणीय घट दिसून आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button