
सीसीटीव्ही कॅमेरे न बसवलेल्या परीक्षा केंद्रावरील कर्मचारी बदलणार!
येत्या बोर्ड परीक्षेसाठी परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याने कोल्हापूर शैक्षणिक विभागात सुमारे १२५ परीक्षा केंद्रांचे केंद्रसंचालक आणि कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. राज्यात निकालात नेहमीच सर्वात पुढे असणार्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने सीसीटीव्ही बसवण्याबाबतही बाजी मारली असून, या जिल्ह्यात केवळ चार परीक्षा केंद्रावर सद्यस्थितीत सीसीटीव्ही नाहीत. रत्नागिरी १११ पैकी २६ केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत.
कोल्हापूर विभागीय मंडळात दहावी व बारावी साठी एकूण ५३९ तर कोकण विभागीय मंडळात २३९ परीक्षा केंद्र आहेत. सातार्यात १६८ पैकी ३३, सांगलीत १५७ पैकी २२, कोल्हापूर २१४ पैकी ४४, रत्नागिरी १११ पैकी २६ आणि सिंधुदुर्ग ६४ पैकी ४ परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे संबंधित शिक्षण संस्थांनी बसवलेले नाहीत. परीक्षेशी संबंधित प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रांबाबत परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत, त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेची संबंधित व्यक्तींची नियुक्ती या केंद्रांव्यतिरिक्त इतर माध्यमिक विद्यालय किंवा उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचार्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले आणि कोकण विभागीय मंडळाच्या सचिव पुनीता गुरव यांनी जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना दिल्या आहेत.
www.konkantoday.com




