
विरोधकांचा प्रचार खोटा, पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणार-शिवसेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर
रत्नागिरी : शहर प्रभाग क्रमांक ४ मध्ये नकली पत्रके वाटली गेल्याचा आरोप करत याविरोधात शहर पोलीस स्थानकात लवकरच तक्रार दाखल करणार असल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांनी दिली. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर उपस्थित होते.
बंदरकर म्हणाले, “उदय सामंत यांच्या माध्यमातून शहरात शाश्वत विकास साधला जात आहे. अनेक उल्लेखनीय विकासकामे पालकमंत्री सामंत यांच्या माध्यमातून केली आहेत. विरोधकांना सध्या बोलण्यासाठी कोणतेही ठोस मुद्दे राहिलेले नाहीत. ते केवळ खराब रस्ते याच गोष्टींवर भाष्य करत आहेत. युतीचे उमेदवार प्रचारात मोठी आघाडी घेत असून, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधी पक्षात असलेल्या आघाडीत बिघाडी झाली असून, ‘उबाठा’ गट एकाकी पडला आहे.” प्रभाग ४ मध्ये फेक पत्रके वाटली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पत्रकार परिषदेत बिपीन बंदरकर यांनी सांगितले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनसामान्यांचा राष्ट्रीय चेहरा आहेत. त्यासाठी शहरपातळीवर चर्चा करण्याची गरजही नाही. युतीच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, सभांना लोकांची मोठी गर्दी जमू लागली आहे. भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक प्रभागात एकदिलाने काम करत आहेत आणि युतीला विजय मिळवून देण्यास सक्रिय आहेत,” असे दीपक पटवर्धन म्हणाले.
या पत्रकार परिषदेत राजेश सावंत यांनी पालिकेविरोधात केलेले आरोपही फेटाळून लावत, युतीचे ३२ च्या ३२ उमेदवार निवडून येतील आणि शिल्पा सुर्वे १५ हजारांच्या मताधिक्य घेतील, असा विश्वास बिपीन बंदरकर आणि दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.




