अक्षयतृतीयेला बाल विवाह होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन…. चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 पोलीस विभागाच्या 112 टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी


रत्नागिरी, दि. 15 ):- अक्षयतृतीयेचा मुहूर्त हा अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी छुप्या मार्गाने बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण व शहरी भागात8 अक्षयतृतीयेला (19 एप्रिल) होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये बालविवाह होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी केले आहे.
तुमच्या गावात किंवा परिसरात बालविवाह ठरला असल्यास किंवा होत असल्यास, त्याबाबतची माहिती चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
बालविवाह लावणे हा दखलपात्र गुन्हा असून, यात केवळ पालकांवरच नाही तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक आणि बिछायत केंद्र चालक यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात. दोषींना 2 वर्षे सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.
भारतीय कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बेकायदेशीर ठरतो. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, तर शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गावागावात सरपंच, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांनी सतर्क राहून विवाहापूर्वी वयाची खात्री करणे आवश्यक आहे.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button