गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (बुक्टू) संघटनेचा प्राध्यापक संपर्क मेळावा

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियन (बुक्टू) संघटनेचा प्राध्यापक संपर्क मेळावा नुकताच  झाला. बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियन (बुक्टू) केंद्रीय युनिटच्यावतीने गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथे संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्राध्यापकांना बुक्टू केंद्रीय युनिटच्या पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन करून शिक्षण क्षेत्रातील भयाण वास्तवावर प्रकाश टाकला.
बुक्टू केंद्रीय युनिटचेअध्यक्ष प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे एकाच स्टाफरूममध्ये अनुदानित-विनाअनुदानित, सी.एच.बी., कंत्राटी असे प्राध्यापकांचे विविध स्तर पडले आहेत. येत्या काळात दिवसेंदिवस प्राध्यापकांच्या समस्या बिकट होत जाणार आहेत, असे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी  यासंदर्भात आणि नेट-सेट बाधित प्राध्यापक, जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अशा विविध पातळ्यांवरील प्राध्यापकांच्या समस्याबाबत संघटनेची शासन आणि न्यायलयीन अशा दोन्ही पातळ्यांवर चाललेल्या संघटनेच्या लढ्याची माहिती उपस्थितांना दिली. विनाअनुदानित कंत्राटी तत्वावर काम करणार्‍या प्राध्यापकांचे वेतन संस्थेऐवजी शासनाने देणे आवश्यक असल्याचे सांगून अशा प्राध्यापकांना शासनाच्या पे रोलवर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य आणि बुक्टूचे सहसचिव डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी प्राध्यापकांचे व्यक्तिगत आणि सामूहिक प्रश्न सोडविणारी बुक्टू ही सर्वात जुनी संघटना असून, अलिकडे उदयाला आलेल्या संघटना प्राध्यापकांची कशी दिशाभूल करीत आहेत, यावर प्रकाश टाकला. काही अधिकारी आणि संघटनांना हाताशी धरून भ्रष्टाचाराचे टोलनाके उभे केले जात असून, ते बंद केले पाहिजेत, अशा व्यक्ती आणि संघटनांपासून प्राध्यापकांनी दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
बुक्टू केंद्रीय युनिटच्या महासचिव डॉ. मधु परांजपे यांनी अनुदानित कायमस्वरूपी प्राध्यापकांची संख्या कमी होत असून, तासिका तत्वावर आणि कंत्राटी स्वरूपात काम करणार्‍या प्राध्यापकांची संख्या वाढत आहे. शिक्षण क्षेत्रासाठी हे धोकादायक आहे, असे प्रतिपादन करून कंत्राटी आणि तासिका तत्वावर काम करणार्‍या प्राध्यापकांच्या समस्या त्यांनी मांडल्या. तसेच संघटनेच्या ध्येय-धोरणांचे नियोजन आणि पुढील वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन करून महाविद्यालयीन स्थानिक संघटना बळकट करण्याचे त्यांनी आवाहन केले.
या मेळाव्यात आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय देवरूख, लांजा महाविद्यालयातील उपस्थित प्राध्यापक प्रतिनिधींनी आपल्या मनोगतातून प्राध्यापकांच्या समस्या मांडल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, बुक्टू लोकल युनिटच्या अध्यक्षा प्रा. बीना कळंबटे आणि महाविद्यालयातील संघटनेच्या अन्य सदस्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शाहू मधाळे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. स्थानिक बुक्टू युनिटचे सचिव प्रा. दत्तात्रय कांबळे यांनी मान्यवरांचे आभार मानले. या मेळाव्याला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य                                    डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button