
कुणकेश्वरमध्ये ‘ट्री ऑफ लाइफ’चे आलिशान हॉटेल; ५० खोल्यांचा प्रकल्प २४ महिन्यांत
नितेश राणे यांच्या उपस्थितीत ताज हॉटेल्ससोबत करार; सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा
‘कोकणची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे ताज हॉटेल्सच्या ‘ट्री ऑफ लाइफ’ ब्रँडचे आलिशान हॉटेल उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्पासाठी मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत संबंधितांमध्ये करार करण्यात आला.
कुणकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या या हॉटेलमध्ये ५० खोल्या असणार असून, प्रकल्पाचे काम २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या हॉटेलमुळे देवगडसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला आणखी मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वरमध्येही ताज समूहाचा प्रकल्प साकारत असल्याने सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर आणखी एक महत्त्वाचे ठिकाण निर्माण होणार आहे. या प्रकल्पातून स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच पर्यटनाशी संबंधित व्यवसायांनाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
कोकणच्या निसर्गसौंदर्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देत सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या प्रयत्नांना या प्रकल्पामुळे बळ मिळणार आहे. पर्यटन वाढीसोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि दरडोई उत्पन्नाला हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे आणि रोहन रानडे उपस्थित होते.




