
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेते पद देण्याची तयारी दाखवली तर त्यांच्यासाठी एका क्षणात मी त्याग करेन- भास्कर जाधव
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी विरोधी पक्ष नेत्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने टीका केली आहे.तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, विरोधी पक्षनेता दिला तर सरकारमधील सहकारी त्याला माहिती देऊन आपल्याला अडचणीत आणतील अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे सरकार विरोधी पक्षनेत्यावर कोणताही निर्णय घेत नाही, अशी टीका जाधव यांनी केली आहे.
महाविकास आघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्र देण्यात आले असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मात्र, सरकारने आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेते पद देण्याची तयारी दाखवली तर त्यांच्यासाठी एका क्षणात मी त्याग करेन, असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले आहे
भास्कर जाधव म्हणाले, दहा टक्के आमदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद दिले जाते. जेव्हा पक्षाच्या गटनेतेपदी माझी निवड झाली तेव्हा हे शक्य आहे असे मला वाटले. मी सचिवांना पत्र लिहले. विरोधी पक्ष नेतेपद निवडीसंदर्भात कायद्यात तरतूद काय याची माहिती लिखित द्यावी अशी मागणी केली. त्यावेळी अशी 10 टक्के सदस्यसंख्येची अट नाही, अशी माहिती सचिवालयाने दिली.
तसेच या सरकारमधील भ्रष्टाचाराची जी प्रकरणे बाहेर येत आहेत ते हिमनगाचे एक टॉक आहे. हे लोक एकमेकांचे पाय ओढत आहेत. विरोधी पक्षनेत्याची घोषणा झाली तर सरकारमधील लोक विरोधी नेत्याला माहिती देऊन एकमेकांना अडचणीत आणतील अशी त्यांना भीती आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.




