शिक्षण विभागाकडून २९, ३० जानेवारी रोजीच्या शाळांबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण!


  • राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी निधन झाले. त्यामुळे त्यामुळे राज्य सरकारने बुधवारी शासकीय सुटी जाहीर केली. तर २८ ते ३० जानेवारी असा तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. मात्र, राज्यातील शाळांना २९ आणि ३० जानेवारी रोजी सुटी नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी अपघाती निधन झाले. त्यामुळे राज्यभर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. तसेच बुधवारी शासकीय सुटी जाहीर केली. त्यानुसार शिक्षण विभागाकडून बुधवारी शाळा बंद राहणार असल्याबाबतच्या सूचनांचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. समाजमाध्यमांत २९ आणि ३० जानेवारी रोजीही शाळांना सुटी असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून संभ्रम दूर करण्यासाठी स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही समाजमाध्यमावर २९ आणि ३० जानेवारी रोजी शाळा बंद राहणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, २९ आणि ३० जानेवारी रोजी सर्व शाळा आणि कार्यालये सुरू राहणार आहेत. तसेच शासकीय दुखवटा असणार आहे. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षांच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यापीठाने बुधवारच्या (२८ जानेवारी) दुपारच्या सत्रातील परीक्षांच्या नियोजनात बदल केला.

बुधवारी सत्रात होणाऱ्या परीक्षांचे फेरआयोजन करण्यात येणार आहे. त्याचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी (२९ जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने बारामती तालुक्यातील बहुतेक शिक्षण संस्था बंद राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातून बारामतीकडे जनसमुदाय येणार असल्याची बाब लक्षात घेऊन विद्यापीठाच्या गुरुवारी दिवसभरातील दोन्ही त्रातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. संबंधित दोन्ही सत्रांतील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे फेरआयोजन करण्यात येणार आहे. त्याचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button