
वेळागर पंचतारांकित प्रकल्प स्थानिकांना विश्वासात घेवूनच केला जाईल -मंत्री नितेश राणे
शिरोडा-वेळागर येथे होऊ घातलेल्या ताज ग्रुपचा पंचतारांकित हॉटेल प्रकल्प झाल्यास स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण होईल. त्यामुळे हा हॉटेल प्रकल्प झाला पाहिजे. मात्र स्थानिक लोकांना विश्वासात घेवूनच पंचतारांकीत हॉटेल प्रकल्प राबविला जाईल, असे मंत्री नीतेश राणे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत स्पष्ट केले.
शिरोडा-वेळागर येथे ताज समुहाच्या माध्यमातून उभारण्यात येणार्या पंचतारांकीत हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिक रहिवाशांच्या मनात असलेल्या शंका, प्रश्न व चिंता जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, नीतेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, दत्ता सामंत संजय आग्रे, जयप्रकाश चमणकर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या बैठकीत स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांच्या सविस्तर स्पष्टीकरण देत त्यांचे समाधान करण्यात आले. पालकमंत्री यावेळी म्हणाले, शिरोडा-वेळागर येथे प्रस्तावित ताज पंचतारांकीत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पर्यटनाला चालना मिळेल तसेच परिसराचा आर्थिक विकास साधला जाईल. जनतेला विश्वासात घेवूनच हा प्रकल्प राबविला जाईल. भविष्यातही अशाच प्रकारे स्थानिक नागरिकांना विश्वासात घेवून, त्यांच्या सूचनांचा विचार करून विकासात्मक निर्णय घेतले जातील असेही ते म्हणाले.
www.konkantoday.com




