
आजपासून घरगणना मोहीम! अनेक गावांचा १०० टक्के ऑनलाईन नोंदणीचा वस्तुपाठ; सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी आघाडीवर.!
शहरी भागात ऑनलाईन स्वगणना करण्यात उदासीनता दिसून येत असताना राज्यातील अनेक गावांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने १०० टक्के नोंदणीचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या नियोजनामुळे काही गावात तर एका दिवसात १०० टक्के ऑनलाईन स्वगणना पार पडली.
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरगणना करण्यात येत आहे. त्याची सुरूवात १ मेपासून सुरू झाली. सुरवातीचे १५ दिवस नागरिकांना ऑनलाईन स्वगणना करण्याची संधी देण्यात आली होती. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण २.४४ कोटींहून अधिक कुटुंबे होती. यामध्ये ग्रामीण भागात सुमारे १.३२ कोटी आणि शहरी भागात सुमारे १.१२ कोटी कुटुंबे होती. त्यावेळी महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ११.२४ कोटी होती.
घरगणनेत एकूण ३३ प्रश्नांशी संबंधित माहिती भरावयाची आहे. ऑनलाईन नोंदणी झाल्याने या कुटुंबाचा आणि प्रगणकांचा घरगणनेचा वेळ वाचणार आहे. घरगणनेचे काम १४ जूनपर्यंत चालेल. ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे, त्यांच्याही घरांना प्रगणक भेट देऊन ऑनलाईन माहितीची खातरजमा करतील.
मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या आठवडाभराच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने प्रथम १०० टक्के स्वगणना नोंदवत महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला. अवघ्या १४४ लोकसंख्या आणि ४३ कुटुंबसंख्या असलेल्या या गावाने प्रशासकीय समन्वयातून हा आदर्श निर्माण केला. मूठ गावासह जिल्ह्यातील तब्बल २६ गावांनी १०० टक्के नोंदणी केली. तर चिपळूणमधील दळवटणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील १०० टक्के स्वगणना करणारे पहिले गाव ठरले. या गावाची लोकसंख्या २,२६२ इतकी असून गावातील नऊ वाड्यांमधील ४२५ घरांची स्वगणना या मोहिमेत कऱण्यात आली.
परभणीतील सुलतानपूर गावातील नागरिकांनी प्रगणक, पर्यवेक्षक यांच्या सहकार्याने स्वगणना पूर्ण केली. या गावात १०२ घरे होती. १३ मे रोजी गावातील सर्व घरांची गणना करून हे गाव परभणी तालुक्यातील पहिले १०० टक्के ऑनलाईन स्वगणना करणारे गाव ठरले. परभणीतील पूर्णा, पाथरी, गोळेगाव, तारूर गव्हाण, निलज, सुकळी, शिपे या गावांनी अवघ्या एका दिवसात सर्व कुटुंबांची ऑनलाईन नोंदणी केली.
बुलढाण्यात तब्बल २१ गावांमध्ये १०० टक्के स्वगणना पार पडली आहे. येथील खामगाव तालुक्यातील तब्बल १५ गावांमध्ये तर एकाच दिवशी १०० टक्के कुटुंबांची स्वगणना करण्यात आली. नांदेडमधील १४ गावांनी १०० टक्के नोंदणी केली आहे. जालन्यातील पाच, सांगलीतील चार, अकोल्यातील तीन, वाशिम, धाराशिवमधील प्रत्येक एक गावाने ही कामगिरी करून दाखविली.




