
गणपतीपुळे संस्थानच्या सरपंचपदी डॉ. केळकर
रत्नागिरी ः गणपतीपुळे- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंचकमिटीच्या नव्या सरपंचपदी मालगुंड येथील डॉ. श्रीराम केळकर यांची निवड झाली आहे. संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या पंचकमिटीने एकमताने ही निवड केली आहे. याबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन केले आहे. श्रीरामनवमीच्या पुण्यदिनी ही निवड करण्यात आली. (कै.) गोविंद केळकर, (कै.) शंकर केळकर, (कै.) विश्वनाथ केळकर यांच्यानंतर डॉ. श्रीराम केळकर यांच्या रूपाने केळकर घराण्यातील ४थी पिढी श्रींच्या सेवेत कार्य करत आहे. २००९ पासून डॉ. केळकर हे पंच म्हणून कार्यरत होते. आता त्यांची सरपंचपदी निवड झाली आहे. अतिशय शांत, प्रेमळ व मनमिळावू स्वभाव आणि अत्यंत हुशार व अभ्यासू व्यक्तीमत्व असलेल्या केळकर यांची निवड संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या पंचकमिटीवर झाल्याने संपूर्ण मालगुंड व गणपतीपुळे परिसरातून विशेष समाधान व्यक्त होत आहे.