सरकारचा मोठा निर्णय ! मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी ‘विशेष गिफ्ट’!!

पुणे : महिलांना मकर संक्रांतीनिमित्त विशेष भेट देण्याचे पाऊल राज्य सरकारने उचलले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभरात महिलांसाठी विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) काळात उद्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक आरोग्य समस्यांवर वेळेत व शास्त्रीय उपचार या क्लिनिकच्या माध्यमातून मिळणार आहेत. हे क्लिनिक मकर संक्रांतीपासून (दि.१४) सुरू होत असून, सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये दर बुधवारी यासाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरु करण्यात येणार आहे.

महिलांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळात संप्रेरकांमधील बदलांमुळे झोपेचे विकार, चिडचिड, नैराश्य, सांधेदुखी, अस्थिसुषिरता (ऑस्टिओपोरोसिस), वजन वाढ, हृदयविकाराचा धोका अशा विविध समस्या आढळतात. मात्र अनेकदा या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. हे लक्षात घेऊन महिलांसाठी स्वतंत्र व समर्पित सेवा देण्याच्या दृष्टीने ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये तसेच निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये हे क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय़ सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.

या क्लिनिकमध्ये महिलांची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार उपचार, समुपदेशन, आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच मानसिक आरोग्य समुपदेशन, कॅल्शियम आणि जीवनसत्व ड संदर्भातील उपचार आणि आवश्यक तपासण्यांविषयी माहिती दिली जाणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये दर बुधवारी होणाऱ्या या विशेष ओपीडीचा लाभ महिलांनी घ्यावा, रजोनिवृत्ती काळातील लक्षणांबाबत संकोच न ठेवता पुढे यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

याबाबत अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे यांनी सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, बृहन्मुंबई महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे की, मेनोपॉज क्लिनिक मकर संक्रांतीपासून सुरू करावे. या क्लिनिकला भेट देणाऱ्या महिला रुग्णांची नोंदवही ठेवावी. या क्लिनिकमध्ये येणाऱ्या महिला रुग्णांची आकडेवारी परिमंडळ स्तरावर दरमहा पाठवावी. याचबरोबर या मेनोपॉज क्लिनिकची जनजागृती करावी.

मेनोपॉझ क्लिनिकमधील सुविधा

  • स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी
  • आवश्यक वैद्यकीय तपासण्या
  • मानसिक आरोग्यविषयक सुमपदेशन
  • औषधोपचार
  • आहार व जीवनशैलीविशषयक मार्गदर्शन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मकर संक्रांतीपासून राज्यात मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये आणि निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये यासाठी दर बुधवारी विशेष बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात येत आहे. – डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त संचालक, कुटुंब कल्याण माताबाल संगोपन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button