ग्राहकांचा विश्वास संपादन करा म्हणजे विकास आपोआपच होईल : उद्योजक मल्हार मलुष्टे

रत्नागिरी : ग्राहकांचा विश्वास संपादन करा म्हणजे विकास आपोआपच होईल असे प्रतिपादन उद्योजक मल्हार मलुष्टे यांनी केले. अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी श्री. शंकर ढोले स्टुडंट्स एनरिचमेंट सेल उपक्रमाअंतर्गत उद्योजक मल्हार मलुष्टे यांची मुलाखत आयोजित केली होती. त्यात ते बोलत होते. कचरा व्यवस्थापन या विषयावर त्यांनी माहिती दिली. ते पॉलिमर इंजिनियर आणि प्लास्टिकपासून कच्चा माल तयार करतात.
त्यांनी अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय ते उद्योजकतेपर्यंतचा प्रवास प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडला. स्वानंदी शेंबवणेकर, अदिती फडके, हिमांक खातू आणि स्वराज डोंगरे या विद्यार्थ्यांनी त्यांची अतिशय प्रभावीपणे मुलाखत घेतली. व्यवसाय सुरू करण्यापासून ते आत्तापर्यंत त्यांना आलेले विविध प्रकारचे चांगले-वाईट अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. तरुण पिढीने नोकरी शोधणारे न होता नोकरी निर्माण करणारे व्हावे त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्य कशाप्रकारे आवश्यक आहे हे श्री. मलुष्टे यांनी अनुभवाद्वारे विद्यार्थ्यांना सांगितले.

याप्रसंगी पर्यवेक्षक दत्तात्रय वालावलकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना चांगली माणसं कमवा की जी तुम्हाला व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोगी पडतील, असे आवाहन केले. या वेळी मल्हार मलुष्टे आणि सौ. मलुष्टे यांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

वाणिज्य शाखाप्रमुख सौ. शिल्पा तारगावकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला प्रा. भूषण केळकर, प्रा. प्रभात कोकजे उपस्थित होते. या कार्यक्रमाला वाणिज्य शाखेतील १२० विद्यार्थी उपस्थित होते. मयुरेश सावंत याने आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button