
“हम होंगे कामयाब ” उपक्रमातून विद्यार्थ्यांना यशाचा नवा मार्ग
१९ विद्यार्थी झळकले गुणवत्तायादीत
रत्नागिरी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने “हम होंगे कामयाब” या उपक्रमांतर्गत विशेष मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. पावस जिल्हा परिषद गटातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
या शिबिरात NMMS (इयत्ता ८ वी), सैनिक स्कूल, स्कॉलरशिप व नवोदय या स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन देण्यात आले. २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान पावस विद्यामंदिर येथे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमासाठी पुण्यातील नामवंत गणित तज्ज्ञ खेमचंद्र पाटील यांना उपलब्ध करून देण्याचे कार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा गणित विषयातील आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला.
स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर, पावस येथील विद्यार्थ्यांनी NMMS (इयत्ता ८ वी) परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेत एकूण १९ विद्यार्थी गुणवत्तायादीत झळकले.
जिल्हास्तरावरील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे : प्राची किशोर सारंग (जिल्हा प्रथम SBC प्रवर्ग), स्वरज सुहास घवळी (द्वितीय OBC प्रवर्ग), चैतन्य सचिन गुबेकर (तृतीय खुला प्रवर्ग), स्मित विजय आंबे (तृतीय OBC प्रवर्ग).
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये जाई किशोर पांचाळ, समृद्धी शरद पाटील, स्वर विद्यानंद आंबे, हुसेन जहीर शेख, स्नेहा संतोष पळये, आराध्या शैलेश बने, आर्या विक्रम गुरव, कश्यप संकेत जाधव, वैष्णवी संदीप कुरटकर, सार्थक नरेश आंबे, सर्वेश विजय आंबे, आभा प्रवीण निंबोणे, वैदिका प्रमोद शिंदे, सोहम प्रमोद बालदे, रोहन अनिल डोंगरे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक आधारवड निलेश सांबरे यांनी अभिनंदन व कौतुक केले. तसेच पुढील गुणवत्ता पूर्ण शिक्षणाच्या वाटचालीसाठी सुभेच्छ्या दिल्या.
या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त करून शाळेचा गौरव वाढवला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली असून, स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता वाढली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांचा “हम होंगे कामयाब” उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
या उपक्रमासाठी संपूर्ण जिजाऊ परिवार तसेच स्पर्धा परीक्षा विभागाचे संदीप पाटील, जिजाऊ संस्थेचे तालुकाध्यक्ष मंदार नैकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र मांडवकर, सचिव केदार चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.




