
कोट्यवधींच्या फसवणुकीप्रकरणी फरार TWJ कंपनीचा संचालक संकेश घाग चिपळूण पोलिसांच्या जाळ्यात
राज्यभरात मोठी खळबळ उडविणाऱ्या TWJ (टीडब्ल्यूजे) कंपनीच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात चिपळूण पोलिसांना मोठे यश मिळाले असून, कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी फरार असलेला कंपनीचा संचालक संकेश घाग याला अटक करण्यात आली आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर अखेर ही कारवाई करण्यात आली.
TWJ कंपनीने अल्प कालावधीत दामदुप्पट परतावा, मासिक निश्चित उत्पन्न व सुरक्षित गुंतवणूक अशा आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात भांडवल उभे केले होते. सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना परतावा दिल्याने कंपनीवर विश्वास वाढला; मात्र काही महिन्यांपूर्वी अचानक परतावा थांबवण्यात आला. त्यानंतर कंपनीची कार्यालये बंद पडली आणि संचालक मंडळ संपर्काबाहेर गेले.
या प्रकारानंतर गुंतवणूकदारांनी विविध पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल केल्या. चिपळूण पोलीस ठाण्यातही याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपासादरम्यान संकेश घाग फरार झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
अटकेनंतर संकेश घागला चिपळूण न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी चिपळूण पोलीस ठाणे व न्यायालय परिसरात फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली होती. अनेक गुंतवणूकदारांनी आपल्या आयुष्याची पुंजी TWJ कंपनीत गुंतवली असून, आता पैसे परत मिळतील का, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
या अटकेमुळे TWJ कंपनीचा मुख्य सूत्रधार व व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर याच्या शोधाला वेग येणार आहे. तसेच कंपनीकडून जमा झालेल्या रकमेचा माग काढणे, बँक व्यवहार, मालमत्ता खरेदी- विक्री, तसेच इतर सहभागी व्यक्तींची भूमिका उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, याआधी अनेक वेळा गुंतवणूकदारांनी आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत मोर्चे, धरणे आंदोलन व उपोषणाचे इशारे दिले होते. आता संकेश घाग अटकेत आल्याने गुंतवणूकदारांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि फसवणूक केलेली रक्कम जप्त करून ती गुंतवणूकदारांना परत मिळावी, अशी ठाम मागणी होत आहे.




