
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी चिपळूण महापालिका सज्ज
चिपळूण शहरात यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी पालिका सज्ज झाली आहे. शहरात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, फिरते हौद, मूर्तीची वाहतूक करण्यासाठी वाहतूकव्यवस्था, मंडप व्यवस्था, सुरक्षाव्यवस्था अशा सर्व सुविधांच्या बाबतीत नियोजन करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पर्यावरणपूरक सण साजरे करण्याकरिता शासनाकडून प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार गणेशोत्सव साजरा करताना प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या श्रींची मूर्तीची विक्री करताना मूर्तीच्या मागील बाजूस स्पष्टपणे दिसेल, अशा स्वरूपाचे ऑईल पेन्ट लाल रंगाने मोल आकाराचे चिन्ह करावे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या श्रींची मूर्ती विक्री करताना नोंदवही ठेवणे बंधनकारक आहे. घरगुती उत्सवाच्या तसेच ६ फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे. श्रींच्या पूजेतील निर्माल्य पालिकेच्या निर्माल्य कलशामध्ये जमा करावे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी लहान आकाराच्या श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठाषना करावी. सार्वजनिक मंडळांकडून ६ फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्यास, मोठ्या मूर्तीचे विसर्जन न करता प्रतीकात्मक स्वरूपात लहान मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.www.konkantoday.com




