
दिवाळीच्या हंगामात रत्नागिरी तालुक्यातील पर्यटक व्यावसायिकांना अच्छे दिन येण्याची अपेक्षा
दिवाळी आठ दिवसांवर आल्याने तालुक्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, रिसॉर्टसूच्या बुकींगला पर्यटकांकडून प्रारंभ झाला आहे. २२ ऑक्टोबरपासून तालुक्यात पर्यटकांची गर्दी होण्यास प्रारंभ होणार असल्याचे हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांमधून सांगण्यात आले. मागील वर्षात निराशा असली तरी यंदा ’अच्छे दिन’ची अपेक्षा पर्यटन व्यावसायिक बाळगून आहेत.
जून महिन्यापासून पर्यटन व्यवसाय बंद होता. दरवर्षी दिवाळीपासून नवीन पर्यटन हंगामाला प्रारंभ होतो. यावर्षी २२ ऑक्टोबरपासून पर्यटकांनी दापोलीतील हॉटेल रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी बुकींग करण्यास प्रारंभ केला आहे. आठ दिवस पर्यटन क्षेत्रात गर्दी पहायला मिळेल असा अंदाज व्यक्त होत आहे. एकंदरीत यावर्षी दिवाळी हंगाम चांगला जाईल आणि पर्यटकांची मोठी गर्दी होईल, अशी आशा हॉटेल व्यावसायिक व्यक्त करत आहेत. पर्यटन हंगाम सुरू होत असला तरी पर्यटकांच्या मार्गातील रस्त्यांचे विघ्न मात्र कायम आहे. गावात पर्यटन स्थळांकडे जाणार्या रस्त्यांची पूर्वी बिकट अवस्था होती. ती आता काही प्रमाणात सुधारली असली तरी, मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था कायम आहे? यामुळे पर्यटकांना तालुक्यात प्रवेश करताना तसेच गावांमध्ये जाताना खड्डेमय रस्त्यांमुळे तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे सध्याच्या रस्त्यांच्या परिस्थितीवरुन स्पष्ट झाले आहे. शिवाय या मुख्य रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पर्यटन व्यवसायाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोकणात येणारा पर्यटक फिरण्याबरोबर मासळीचा देखील आस्वाद घेण्यासाठी येतो. ८५ ते ९० टक्के पर्यटक मासे जेवणात मागतात. त्यामुळे हर्णे बंदरात देखील वेळोवेळी मासळी लिलावाच्या वेळी गर्दी पहायला मिळते. जर कोकणात येणारा पर्यटक कमी झाला तर मासेमारी व्यवसायावरही परिणाम होणार आहे. एकदंरीत ही साखळी असल्याने पर्यटकांची संख्या घटल्यानंतर सार्या साखळीवरच परिणाम होतो.www.konkantoday.com




