
आ. किरण सामंत यांनी आश्वासन दिल्याने कुवे संघर्ष समितीचे उपोषण स्थगित
कुवे येथील कचरा डेपो स्थलांतरित करण्यात आल्याचे लेखी पत्र मुख्याधिकार्यांनी दिल्याने कुवे संघर्ष समितीच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी छेडण्यात आलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे.
नगर पंचायतीच्यावतीने लांजा शहर परिसरात साठणारा कचरा गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कुवे येथील जागेत टाकला जात होता. त्यामुळे येथे कचर्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि पाणी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे कुवे संघर्ष समितीच्यावतीने संबंधित कचरा डेपो अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने अखेर कुवे संघर्ष समितीच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. ग्रामस्थांच्या उपोषणाची दखल घेत अखेर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी कचरा टाकण्यासाठी भाडेतत्वावर जागा घेण्यासाठी जाहिरात काढली होती. त्यानंतर ९ ऑगस्टपासून कुवे येथील कचरा डेपो स्थलांतरित करण्यात आला आहे. दरम्यान, कचरा डेपोची आमदार किरण सामंत यांनी जागेवर जाऊन पाहणी केली होती. ग्रामस्थांच्या मागणीनुसार, कचरा डेपो स्थलांतरित करण्यात आल्याने उपोषण हे मागे घेण्यात आल्याची माहिती परवेश घारे यांनी दिली.
www.konkantoday.com




