
पावस येथे नादुरुस्त गाडी दुरुस्तीसाठी घेऊन जात असताना शॉर्टसर्किट होऊन मारुती ओमनी गाडीने भरबाजारपेठेत अचानक पेट घेतला
नादुरुस्त गाडी दुरुस्तीसाठी घेऊन जात असताना शॉर्टसर्किट होऊन मारुती ओमनी गाडीने भरबाजारपेठेत अचानक पेट घेतल्याची घटना काल (६ जुलै) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पावस येथे घडली. भर बाजारपेठेत गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
तालुक्यातील मेर्वी येथील संजय बेंद्रे यांच्या मालकीची मारुती ओमनी गाडी (क्रमांक MH08-R-1550) ही गाडी मेकॅनिक दुरुस्तीसाठी घेऊन जात असताना पावस येथे शॉर्टसर्किट झाल्याने गाडीने अचानक पेट घेतला. दरम्यान, काही जागरूक नागरिकांनी ताबडतोब फोनवरून रनपार येथे असलेल्या फिनोलेक्स कंपनीच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाची व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थांसह दलाने व्हॅनला लागलेली आग नियंत्रणात आणली. मात्र, या घटनेत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली.




