
चिपळुणातील योग साधिका पूजा लढ्ढा हिला आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सुवर्णपदकाची चमक
चिपळुणातील योग साधिका पूजा लढ्ढा हिने नेपाळच्या काठमांडू येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योगासने स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. २३ ते ४० वयोगटात तीने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
या स्पर्धेत विविध देशांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. तगड्या स्पर्धकांच्या उपस्थितीतही पूजाने अत्यंत लक्षवेधी सादरीकरण करत न्यायमंडळाची दाद मिळवली. तिच्या प्रदर्शनातील स्थिरता, तंत्र आणि सौंदर्य यामुळे तिला सर्वाधिक गुण मिळाले.
भारतीय संघातील इतर सदस्यांसोबत पूजाने या स्पर्धेपूर्वी दीर्घ काळ तयारी केली होती. योगातील तिची निष्ठा, सातत्यपूर्ण सराव आणि मानसिक स्थैर्य या यशामागील महत्त्वाची कारणे ठरली.
पूजा लढ्ढा हिच्या या कामगिरीमुळे चिपळूण शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाबद्दल शहरात विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे