
जिल्ह्यात 130 कुणबी मराठा व कुणबी मराठा नोंदी, प्रमाणपत्रे 11 जणांनातर 4 लाख 3 हजार 849 कुणबी प्रमाणपत्रे वितरीत
*रत्नागिरी, दि. 22 – जिल्हयामध्ये मागील 3 महिन्यापासून विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली कुणबी मराठा, मराठा कुणबी व कुणबी नोंदीबाबत काम सुरु आहे. जिल्ह्यामध्ये 53 लाख 66 हजार 750 इतक्या नोंदी तपासण्यात आल्या. त्यापैकी 130 नोंदी कुणबी मराठा व मराठा कुणबी तसेच 4 लाख 61 हजार 600 कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत. या नोंदीवरुन आजअखेर जिल्ह्यात तसेच मराठा कुणबी / कुणबी मराठा व्यक्तींना 11 व कुणबी व्यक्तींना 4 लाख 3 हजार 849 जात प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत. मराठा व खुल्या समाजातील नागरिकांचे उद्या 23 जानेवारी 2024 पासून सर्वेक्षणाचे काम सुरु होणार आहे.
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 31 ऑक्टोबर 2023 नुसार निवृत्त न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या स्वीकृत केलेल्या पहिल्या अहवालाच्या अनुषंगाने तसेच शासन निर्णय दिनांक 3 नोव्हेंबर 2023 नुसार महसुली अभिलेखे, जन्ममृत्यू रजिस्टर संबंधी अभिलेखे (गाव नमुना 14), शैक्षणिक अभिलेखे, कारागृह विभागाचे अभिलेखे, पोलीस विभागाचे अभिलेखे, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील अभिलेखे, भूमी अभिलेख विभागाचे अभिलेखे, जिल्हा सैनिक विभाग यांच्याकडील अभिलेखे, जिल्हा वक्फ अधिकारी, शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशीलाबाबतची अभिलेखे, जात पडताळणी समितीकडील अभिलेखे इत्यादी अभिलेखाची तपासणी करण्याचे निर्देश प्राप्त झालेले होते. ही अभिलेख तपासणी दिनांक 10 डिसेंबर 2023 पर्यंत करण्यात आली. त्यानंतर दि. 11 डिसेंबर 2023 रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत या कामकाजाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. समितीच्या सूचनेनुसार अभिलेख तपासणीचे कामकाज पुढे सुरु ठेवण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत आढळून आलेल्या कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी नोंदीचा अहवाल न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीस सादर करण्यात आला.
मुख्यमंत्री महोदयांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे दिलेल्या सूचनेनुसार तपासणीमध्ये आढळून आलेल्या कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी नोंदी गाव चावडीवर प्रसिध्द करुन, तहसीलस्तरावर शिबीरे आयोजित करुन, जातीचे दाखले वितरीत करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने मराठा व खुल्या समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविले आहे. हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेकडून केले जाणार आहे. आयोगाच्या 22 डिसेंबर 2023 च्या पत्रानुसार जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी तहसीलदार यांची नोडल अधिकारी, नायब तहसीलदार यांची सहाय्यक नोडल अधिकारी, तसेच तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक इत्यादीच्या पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून गावनिहाय नियुक्त्या करण्यात आल्या. त्यानंतर आयोगाच्या दि. 5 जानेवारी 2024 रोजीच्या पत्रानुसार 100 कुटुंबासाठी 1 प्रगणक व प्रत्येकी 15 प्रगणकांसाठी 1 पर्यवेक्षक याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या फेरनियुक्त्या करण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यामध्ये अंदाजे एकूण 4 लाख 20 हजार 999 कुटुंबे असून, त्यांच्या सर्वेक्षणासाठी 4 हजार 155 प्रगणक व 271 पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य मागास आयोगाच्या दिनांक 17 जानेवारी 2024 च्या पत्रानुसार प्रत्येक तालुक्यात 300 प्रगणकांसाठी 1 प्रशिक्षक, 300 ते 600 प्रगणकांसाठी 2 प्रशिक्षक व 600 च्या जास्त प्रगणकांसाठी 3 प्रशिक्षक याप्रमाणे प्रशिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी, तालुकास्तरीय प्रशिक्षक यांना गोखले इन्स्टियूटकडून नियुक्त प्रशिक्षकांमार्फत दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर तालुकास्तरीय प्रशिक्षकांमार्फत तालुक्यात नियुक्त पर्यवेक्षक व प्रगणक यांना 21 व 22 जानेवारी 2024 रोजी प्रशिक्षण देण्यात आले.
www.konkantoday.com