
झरेबांबर येथे कोंबड्याच्या खुराड्यात घुसले भलेमोठे अजगर
दोडामार्ग : झरेबांबर (गावठणवाडी) येथील रूपेश केशव गवस यांच्या गावठी कोंबड्याच्या खुराड्यात आणि साटेली भेडशी थोरले भरड येथील संजय शशिकांत धर्णे यांच्या काजू बागायतीत असलेल्या भल्या मोठ्या दोन अजगरांना सर्पमित्र लाडू वसंत गवस यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
झरेबांबर येथे गवस यांचा गावठी कोंबड्याचा खुराडा घराच्या पाठीमागील बाजूस आहे. याठिकाणी भला मोठा दहा फुटी अजगर रात्री खुराड्यात वस्तीला होता, सकाळी नेहमीप्रमाणे कोंबड्यांना सोडण्यासाठी घरातील एकजण गेला असता आत अजगर असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ सर्पमित्र लाडू गवस यांना बोलावून घेण्यात आले. यावेळी अजगराने सहा मोठी कोंबडी मारली तर 3 खाल्ली. यानंतर लाडूने त्याला पकडून नेले. हा अजगर पकडून झाल्यावर लगेच थोरले भरड या ठिकाणी संजय धर्णे आपल्या काजू बागायतीत साफसफाई करताना दहा फुटी मोठा अजगर दिसला. ज्यांनी देखील लाडू यांना संपर्क करत बोलावून घेतले. या अजगरालासुध्दा त्याने पकडत नैसर्गिक अधिवासात सोडले. साप कुठेही दिसल्यास आपल्याशी संपर्क करा, असे आवाहन लाडू गवस यांनी केले आहे.