
खेडमध्ये एसटीतील गर्दीमुळे दोन शाळकरी विद्यार्थिनींना भोवळ; कोरेगाव आरोग्य केंद्रात डॉक्टर-कर्मचारी गैरहजर असल्याचा आरोप
खेड-पन्हाळजे बस रद्द केल्याने बहिरवली बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी; १०८ रुग्णवाहिकेतून विद्यार्थिनींना कळबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
खेड : खेड बसस्थानकातून खाडीपट्टा विभागात जाणारी दुपारी २.१५ वाजताची खेड-पन्हाळजे एसटी बस रद्द करण्यात आल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला. दुपारच्या सुमारास खेड-बहीरवली बसमध्ये दोन बसमधील प्रवाशांची गर्दी झाल्याने प्रवासादरम्यान दोन शाळकरी विद्यार्थिनींना गुदमरल्यासारखे होऊन चक्कर आली. ही घटना दापोली नाका येथील सहजीवन हायस्कूलजवळ घडली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.
शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी खेड बसस्थानकातून दुपारी २.१५ वाजता सुटणारी खेड-पन्हाळजे बस रद्द करण्यात आली होती. त्यामुळे त्यानंतर खाडीपट्टा विभागाकडे जाणाऱ्या खेड-बहीरवली बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी चढले. एकाच बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी झाल्याने प्रचंड गर्दी निर्माण झाली. या गर्दीत मुंबके गावातील नरळकर आणि जाधव या दोन शाळकरी विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना चक्कर येऊन त्या बसमध्येच पडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्याने बस कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आली. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य आणखी वाढले.
यावेळी जागरूक प्रवासी अश्विन गुरव यांनी तातडीने १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला. रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर दोन्ही विद्यार्थिनींना कळबणी बुद्रुक येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याने दोन्ही विद्यार्थिनींची प्रकृती नियंत्रणात आली. त्यामुळे पालकांसह प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
एक बस रद्द झाल्याने दुसऱ्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेण्याची वेळ का आली? प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित का नव्हते, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
या प्रकाराची जिल्हा परिषद अध्यक्ष, आरोग्य सभापती तसेच आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कथित गैरहजेरीची सखोल चौकशी करावी. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अश्विन गुरव यांच्यासह खाडीपट्ट्यातील ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही बसफेऱ्या रद्द करण्यामागील कारणांची चौकशी करून प्रवाशांची गैरसोय आणि सुरक्षिततेचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे. या घटनेची प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते, याकडे खाडीपट्ट्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




