
सातासमुद्रापार रत्नागिरीचा डंका..
नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांचा मलेशियात प्रतिष्ठित ‘नवभारत ग्लोबल अवॉर्ड’ने गौरव
तळागाळातील समाजकारण, महिला सक्षमीकरण आणि धडाकेबाज कार्यपद्धतीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल*
क्वालालंपूर:
रत्नागिरीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय पटलावर आपल्या कृतिशील आणि संवेदनशील नेतृत्वाने स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाध्यक्षा तथा रत्नागिरी नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला आहे. नवभारत मीडिया समूहातर्फे मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित भव्य सोहळ्यात त्यांना प्रतिष्ठित ‘नवभारत ग्लोबल अवॉर्ड’ (Navabharat Global Malaysia Excellence Summit & Awards) प्रदान करून सन्मानित करण्यात आले.*
भारत आणि मलेशिया यांच्यातील व्यावसायिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेवर आधारित ‘नवभारत इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स समिट आणि सन्मान सोहळा’ मोठ्या दिमाखात पार पडला. व्यवसाय, नेतृत्व, नाविन्यता, माध्यम आणि सामाजिक प्रभाव यांना एकत्र आणणाऱ्या या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री श्री. पंकज भोयर, टुरिझम मलेशियाचे महासंचालक मोहम्मद अमिरुल रिझाल अब्दुल रहीम, नवभारत प्रेस लिमिटेडचे स्टीव्हन सिंग यांच्यासह भारत आणि मलेशियातील राजनैतिक, सरकारी व उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. या परिषदेत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीच्या नवीन संधींवर सखोल चर्चा झाली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी वर्षाताई ढेकणे यांचे पती तथा रत्नागिरी शहर भाजपा अध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे,दोन्ही सुपुत्र शौर्य आणि आयुष विशेष उपस्थित होते.
प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे कृतिशील नेतृत्व
सौ. वर्षा ढेकणे यांचा प्रवास केवळ एक राजकीय पदाधिकारी म्हणून मर्यादित न राहता, समाजकारणाचा वसा घेतलेल्या एका निष्ठावंत लोकप्रतिनिधीचा राहिला आहे. कार्यालयात बसून केवळ कागदोपत्री आदेश देण्यापेक्षा प्रत्यक्ष घटनास्थळी उभे राहून समस्या मुळापासून सोडवणे, ही त्यांच्या कामाची खास शैली आहे. पावसाळ्यापूर्वी प्रभागातील गटारे आणि नालेसफाईची कामे सुरू असताना स्वतः जेसीबीच्या कामाच्या ठिकाणी उभे राहून स्वच्छतेचा दर्जा तपासून घेण्यापासून ते नागरिकांच्या तक्रारींचे प्रशासकीय पातळीवर निवारण करण्यापर्यंत त्या नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या या दांडग्या जनसंपर्काची पोचपावती म्हणूनच २०२५ च्या रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मधील मतदारांनी त्यांना ६७० मतांच्या विक्रमी फरकाने विजयी केले.
संघटन कौशल्य आणि राज्यस्तरीय दखल
रत्नागिरी शहर भाजपा अध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी जिल्ह्यात महिलांचे भक्कम संघटन उभे केले आहे. भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने ग्रामीण आणि शहरी भागातील तळागाळातील महिलांपर्यंत शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना पोहोचवण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट संघटन कौशल्याची दखल यापूर्वी राज्य स्तरावरही घेतली गेली असून, मुंबईतील भव्य ‘राखी प्रधान’ सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता.
बहुआयामी समाजकारण आणि महिला सक्षमीकरण
राजकारणासोबतच ‘झेप’ या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकारी, ‘शौर्य’ पर्यटन संस्थेच्या अध्यक्षा आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. वैयक्तिक आनंद साजरा करताना वंचित घटकांना विसरता कामा नये, या भावनेतून स्वतःच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून रत्नागिरीतील ‘शासकीय प्रतिमा महिला वसतिगृहातील’ गरजू महिलांना जीवनावश्यक धान्य व वस्तूंचे वाटप करून त्यांनी समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. याशिवाय, शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कष्टकरी सफाई कामगारांना दिवाळीचा फराळ वाटप करणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देणे, असे अनेक उपक्रम त्या सातत्याने राबवत असतात.
रत्नागिरीच्या स्थानिक नागरी प्रश्नांपासून सुरू झालेला सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांचा हा सेवाभावी प्रवास आज मलेशियाच्या आंतरराष्ट्रीय मंचावर पोहोचला आहे. त्यांच्या या गौरवामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आंतरराष्ट्रीय गौरवाची झळाळी आणि भावी वाटचालीचे शुभसंकेत
सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांना मलेशियात मिळालेला ‘नवभारत ग्लोबल अवॉर्ड’ हा केवळ एका व्यक्तीचा किंवा एका प्रभागापुरता मर्यादित सन्मान नसून, तळागाळातील महिला नेतृत्वाने गाठलेल्या उंचीची पावती आहे. भाजपच्या एक धडाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या म्हणून त्यांनी उभे केलेले संघटन आणि प्रत्यक्ष कामाचा झपाटा पाहता हा गौरव निश्चितच अर्थपूर्ण ठरतो. एकीकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि राजकीय प्रतिनिधित्वाच्या नव्या अध्यायाची नांदी मानल्या जाणाऱ्या ‘डिलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) व महिला आरक्षणाच्या प्रक्रियेकडे देशाचे लक्ष लागले असताना, दुसरीकडे रत्नागिरीच्या एका कणखर महिला नेतृत्वाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला सन्मान अनेकांच्या भुवया उंचावणारा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. हा निव्वळ योगायोग म्हणावा की आगामी काळातील मोठ्या बदलांचा आणि संधींचा शुभसंकेत, अशी चर्चा राजकीय व सामाजिक वर्तुळात रंगू लागली आहे. वर्षाताईंच्या कर्तृत्वाला मिळालेली ही जागतिक दाद त्यांच्या पुढील अधिक भक्कम आणि व्यापक वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणादायी व सूचक मानली जात आहे.




