अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ नोव्हेंबर रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालय रत्नागिरी येथे शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
वर्षभरात दिवंगत झालेल्या रंगकर्मी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विषय पत्रिकेनुसार शाखेचे प्रमुख कार्यवाह वामन कदम यांनी वाचून दाखवलेल्या गतवर्षीच्या इतिवृत्ताला मंजुरी, खजिनदार सतीश दळी यांनी मांडलेल्या जमा-खर्चाला मंजुरी तसेच पुढील वर्षाकरिता लेखापरीक्षकाची नेमणूक करणे यावर सविस्तर चर्चा करून विषयांना मंजुरी देण्यात आली.


शाखेने वर्षभर राबवलेले सर्व उपक्रमाबाबत अध्यक्ष समीर इंदुलकर यांनी सविस्तर माहिती दिली, जसे की मराठी अभिवाचन स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, मध्यवर्ती नाट्य परिषदेचे विश्वस्त तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या आवाहनानुसार नाट्य परिषद रत्नागिरी शाखेने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील नाट्यमंडळांना आवाहन करून गावांमध्ये कच्चे बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी सविस्तर माहिती दिली.
श्री. इंदुलकर यांनी पुढील वर्षभरात नाट्य परिषद शाखा रत्नागिरी मार्फत एकपात्री अभिनय स्पर्धा, रोहन मापुस्कर यांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर, तसेच संगीत ताटकातील नाट्यप्रवेशांची स्पर्धा आणि आवाजाची कार्यशाळा हे उपक्रम राबवले जाणार असल्याचे नमूद केले.
आयत्या वेळच्या विषयात दुर्गेश आखाडे यांनी शंभराव्या नाट्यसंमेलनाचा समारोप कधी होणार अशी विचारणा केली असता त्याबाबतचा निर्णय मध्यवर्ती मुंबई कडून घेतला जाईल, असे श्री. इंदुलकर यांनी नमूद केले.
विजय साळवी यांनी मोठ्या शहराप्रमाणे रत्नागिरी देखील कलाकार कट्टा नाट्य परिषदेमार्फत सुरू करावा, असे सूचित केले. योगेश सामंत यांनी युवा सभासदांना उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात यावे अशी सूचना केली.
सभेच्या वेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचा घनश्याम मगदूम यांनी तयार केलेला वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button