
गणपतीपुळे समुद्र दुर्घटना : बेपत्ता पाचही पर्यटकांचे मृतदेह सापडले; परिसरात शोककळा
गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचही तरुणांचे मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. पोलीस, कोस्टगार्ड, जीवरक्षक, मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त शोधमोहीमेनंतर सर्व मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे गणपतीपुळे परिसरासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीपक आदमाने (१९) आणि यश रामेश्वर कांबळे (१९) यांचा समावेश आहे. हे सर्व युवक बिडकीन (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी होते.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रशासन, कोस्टगार्ड, जीवरक्षक पथक तसेच स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती आणि भरती-ओहोटीच्या आव्हानांवर मात करत सलग शोधमोहीम राबविण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर अखेर पाचही युवकांचे मृतदेह शोधण्यात यश आले.
शोधमोहीमेदरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर तसेच जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मोहिमेचा आढावा घेतला.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासनाने पर्यटकांना विशेष सतर्कतेचे आवाहन केले आहे. समुद्राची स्थिती धोकादायक असताना पाण्यात उतरू नये, तसेच समुद्रकिनाऱ्यावरील सूचना आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जाकदेवी आरोग्य केंद्रात जाऊन मृत युवकांच्या नातेवाईकांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




