जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत ६ महिन्यांत कॅन्सर पूर्व-तपासणी यंत्रणा कार्यान्वित करणार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत वाटद (खंडाळा) येथील अडीच कोटींच्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी ३ कोटी खर्चून उभारणार ‘संविधान भवन’

रत्नागिरी, दि. २८ ) : आगामी सहा महिन्यांत जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्करोग (कॅन्सर) पूर्व-तपासणीची यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, जेणेकरून महिलांना या आजारापासून सुरक्षित ठेवता येईल. महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी कर्करोग प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण योजना शासनाच्यावतीने राबवली जात आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
वाटद (खंडाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते कुदळ मारून व कोनशिला अनावरण करून आज झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा परिषद सदस्य महेश ऊर्फ बाबू म्हाप, अर्थ व शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये,
पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी वाटद (खंडाळा) येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पाचही मतदारसंघांत उभारणार ऐतिहासिक ‘संविधान भवन’
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधान जनमानसात रुजवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ३ कोटी रुपये खर्च करून ‘संविधान भवन’ उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सामंत यांनी दिली. जातीपातीचे राजकारण बाजूला सारून असा उपक्रम राबवणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला असून, या ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांचे विचार घराघरांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रदूषणविरहित उद्योग आणि विकासासाठी एकजुटीचे आवाहन
जिल्ह्यात उद्योग वाढीस लावण्यासाठी आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसीच्या माध्यमातून भविष्यातही प्रदूषणविरहित आणि स्थानिकांना रोजगार देणाऱ्या प्रकल्पांनाच प्राधान्य दिले जाईल. शहरासह ग्रामीण भागातील शाळा, पायाभूत सुविधा आणि दळणवळणाच्या विकासावर विशेष भर दिला जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या अडीअडचणी सोडवणे, तसेच विरोधक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या जनहिताच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणे, ही आपली मुख्य जबाबदारी आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय आणि सर्वसामान्य जनतेने एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. चाळके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी केले, सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केले, तर आभार अनिकेत सुर्वे यांनी मानले. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button