
शेतकऱ्यांना सोलर कुंपणासाठी १०० टक्के अनुदान द्यावे : प्रसाद सावंत
हवामान बदल, दुष्काळ आणि महाग औषधांमुळे त्रस्त आंबा उत्पादकांना विशेष अनुदान द्या
रत्नागिरी, दि. २९: रानडुक्करासह इतर वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे कोकणातील शेतकरी हतबल झाला असून त्यांना यातून सावरणे गरजेचे आहे. त्यासाठी सोलर कुंपण हा चांगला पर्याय असल्याने त्यांना त्यासाठी शंभर टक्के अनुदान द्यावे अशी मागणी ठाकरे युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या संकटात सापडला आहे. हवामान बदल, दुष्काळी परिस्थिती, वन्य प्राण्यांचा उपद्रव आणि फवारणी औषधांच्या वाढलेल्या किमतींमुळे आंबा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे त्यामुळे त्यांनाही विशेष पैकेज देण्याची मागणीही ह्यावेळी करण्यात आली आहे.
हवामान बदलाचा फटका
गेल्या दोन वर्षांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. पाऊस वेळेवर येत नाही, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, तर कधी अचानक वाढणारी उष्णता यामुळे आंब्याचा मोहोर गळून जात आहे. मोहोर आला तरी फळधारणा होत नाही. त्यामुळे आंबा उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांनी घट झाली आहे.
दुष्काळामुळे बागा धोक्यात
पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे विहिरी, नाले आटले आहेत. पाणी नसल्यामुळे बागा जगवणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बागा जगवल्या आहेत.
फवारणी औषधे आवाक्याबाहेर
हवामान बदलामुळे आंब्यावर फळमाशी, तुडतुडे आणि बुरशीजन्य रोग वाढले आहेत. त्यासाठी लागणारी कीटकनाशके आणि बुरशीनाशके दुपटीने महागली आहेत. एका एकर फवारणीसाठी १५ ते २० हजार रुपये खर्च येतो. औषधे महागल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी फवारणीच बंद केली आहे.
रानडुक्करांसह इतर वन्य प्राण्यांचा धुमाकूळ, शेतकरी हवालदिल
दुसरीकडे रानडुक्कर, माकड आणि गव्यांनी शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील केले आहे. रात्रभर राखण करूनही पीक वाचत नाही. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात रानडुक्कर, गवा, माकड व इतर वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
रात्रभर शेतात राखण करूनही शेतकऱ्यांचे आंबा, काजू, भात, भाजीपाला ही पिके उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे कोकणातील शेतकरी हतबल होऊन शेतीपासून दूर होत आहे. शेती हाच कोकणातील शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय असून, तोच धोक्यात आला आहे. सोलर कुंपण ही या समस्येवर प्रभावी उपाय योजना आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या कुंपणामुळे वन्य प्राण्यांना इजा न होता ते शेतात येण्यापासून परावृत्त होतात. परंतु एका एकरासाठी सुमारे ५०,००० रुपये खर्च येत असल्यामुळे सामान्य शेतकऱ्याला ते परवडत नाही. त्यामुळे कोकणातील प्रत्येक शेतकऱ्याला सोलर कुंपणासाठी १००% अनुदान देण्यात यावे. ही योजना तातडीने रत्नागिरी जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरु करावी. अनुदानाची प्रक्रिया सोपी व ऑनलाईन करावी जेणेकरून शेतकऱ्याला दलालांकडे जावे लागणार नाही. सोलर कुंपणासाठी शासकीय मदत केल्यास कोकणातील शेतकरी पुन्हा जोमाने शेती करेल. असे प्रसाद सावंत म्हणाले.
शिवसेनेच्या मागण्या
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने सरकारकडे मागणी करण्यात आली आहे की, आंबा उत्पादकांना फवारणी औषधांवर ५० टक्के अनुदान द्यावे, औषधांच्या किमतीवर नियंत्रण आणावे आणि शेतकऱ्यांना सोलर कुंपणासाठी १०० टक्के अनुदान द्यावे.
सरकारने उद्योगपतींची कर्जे माफ केली, मग शेतकऱ्याला मदत का नाही, असा सवाल युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी उपस्थित केला. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रधान सचिव कार्यालयाला ई-मेलद्वारे पाठवण्यात आले आहे.




