
वाशिष्ठी आणि जगबुडी नदीत जलप्रदुषण, स्वातंत्र्यदिनी मच्छिमारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे वाशिष्ठी आणि जगबुड़ी नदीत होत असलेल्या जलप्रदषणाबाबत वारवार आवाज उठवूनही न्याय मिळत नसल्याने स्वातंत्र्यदिन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दर्यासारंग मच्छिमार भोईसमाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.
औद्योगिक वसाहतील रासायनिक कारखान्यांमध्ये उत्पादन घेताना निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर कारखान्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात (ETP) प्रक्रिया करून ते पाणी सामुदायिक सांडपाणी प्रकल्पाला (CETP) द्यायचे आहे. या प्रकल्पात या पाण्यावर पुन्हा प्रक्रिया केल्यानंतर त्यातील स्लच बाजूला करून ते पाणी जलवाहिनीद्वारे खोल समुद्रात सोडायचे आहे. मात्र या सांडपाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता ते सांडपाणी सोनपात्रा नदीमार्गे वाशिष्ठी आणि जगबुडी खाडीत सोडले जात असल्याने या दोन्ही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदषण होवून मासे मरत असल्याचा आरोप येथील मच्छिमारांकडून केला जात आहे.
वाशिष्ठी आणि जगबुड़ी या दोन्ही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदषण होत असल्याने नदीपात्रात मासेमारी करून उपजिविका करणाऱ्या भोई समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छिमारांवर होणारा हा अन्याय थांबावा यासाठी गेली अनेक वर्षे येथील समाजबांधव वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून संबधित विभागाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने मच्छिमार बांधवानी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषणाबाबत तक्रार घेऊन जाणाऱ्या मच्छिमारांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप ही मंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी खेड तहसीलदार याना दिलेल्या निवेदनात केला आहे.
www.konkantoday.com




