
’आपले सरकार सेवा केंद्र’ जाहिरातीत दुरुस्ती; चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यातील गावांच्या यादीत बदल
रत्नागिरी, दि. ११ ): जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत काही लिपिकीय आणि गणकीय त्रुटींमुळे प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यात आली आहे. या दुरुस्तीनुसार चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यातील गावांच्या यादीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली आहे.
चिपळूण तालुक्यात ‘आकले’ गावाचा समावेश
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मूळ जाहिरातीत चिपळूण तालुक्यातील रिक्त जागांच्या यादीत अनुक्रमांक १५६ येथे दुरुस्ती करण्यात आली असून, यादीमध्ये ‘आकले’ या गावाचे नाव नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनुक्रमांक १५७ मधील गावांच्या यादीत ‘आकले’ हे गाव समाविष्ट असल्याचे आता ग्राह्य धरण्यात येणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील ‘चांदेराई’ गाव वगळले
मूळ जाहिरातीत रत्नागिरी तालुक्यातील ‘चांदेराई’ (अनुक्रमांक २१६) या गावाचा समावेश करण्यात आला होता. मात्र, लोकसंख्येच्या निकषानुसार गणना करताना यात त्रुटी राहिल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. आपले सरकार सेवा केंद्रासाठी आवश्यक असलेल्या निर्धारित लोकसंख्येपेक्षा या गावाची लोकसंख्या कमी असल्याने, ‘चांदेराई’ हे गाव आणि त्या अनुषंगाने दर्शविण्यात आलेली रिक्त जागा यादीतून वगळण्यात आली आहे.
इतर अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच कायम
ही करण्यात आलेली दुरुस्ती मूळ जाहिरातीचाच एक अविभाज्य भाग असणार आहे. या बदलां व्यतिरिक्त मूळ जाहिरातीतील इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल करण्यात आलेला नाही, त्या पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. संबंधित उमेदवारांनी आणि नागरिकांनी या बदललेल्या यादीची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यासंदर्भातील सविस्तर शुद्धिपत्रक जिल्ह्याच्या www.ratnagiri.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.




