
वटपौर्णिमेच्या निमित्ताने पिंपळ वृक्षाचे वृक्षारोपण उत्साहात

आनंदनगर ,थिबा पॅलेस येथील उद्यानात वटपौर्णिमेच्या निमित्ताने पिंपळ वृक्षारोपण करण्यात आले .९वर्षांपूर्वी उघड्या माळरानावर वड आणि औदुंबराचे झाड लावण्यात आले होते त्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्या जागेवर हे उद्यान उभारण्यात आले .आज हे दोन्ही वृक्ष अतिशय डौलाने बहरलेले आहेत.
आपल्या भारतीय संस्कृतीत सण उत्सवांची जी परंपरा आहे त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे .परंतु आज काळाची गरज म्हणून विज्ञान आणि रुढीपरंपरा यांची सांगड घालण्याची खरी गरज आहे. कारण आपल्या समाजात बहुसंख्य समाज हा केवळ रूढी परंपरा पाळण्यात धन्यता मानतो. परंतु एखादी रुढी परंपरा आपण का पाळायची ,त्याला काही वैज्ञानिक बाजू आहे का हे समजून जर आपण प्रत्येक सण आणि उत्सव साजरे केले तर त्यातून निश्चितच संपूर्ण मानव जात आणि पर्यावरण यांचा समतोल राखला जाईल.
याच तत्वावर विश्वास असणाऱ्या काही महिला गेली दहा वर्षे अशा तऱ्हेचे समाज उपयोगी सण उत्सव साजरे करत आहेत. यंदा लावलेला पिंपळवृक्ष जसजसा वाढत जाईल, बहरत जाईल तसतसे या उद्यानात येणाऱ्या अबाल वृद्धांना ही पर्यावरण पूरक वृक्षराजीची शितल छाया सुखावून जाईल. याच उद्यानात या महिलांनी अतिशय उपयुक्त अशा कडुनिंब, अर्जुन या औषधी वनस्पतींची लागवड केली आहे.
या कार्यक्रमाला प्रतिभा प्रभुदेसाई, आरती दामले, सुप्रिया शिकेरकर, मंजुषा सामक ,निर्मला जैन, प्रतिभा भिंगारदिवे ,प्रमोदिनी शेटेय,रश्मी घुडे ,मधुरा बोंडाळे, वैशाली पटवर्धन ,आर्या गुणे,श्रीमती पाध्ये ,सुवर्णा चौधरी ,वंदना वेर्णेकर आणि श्रद्धा कळंबटे या उपस्थित होत्या. वटपौर्णिमेच्या निमित्ताने या महिलांनी दोन तास वटवृक्षाच्या सानिध्यात घालवले आणि पुढच्या वर्षी करता नवीन संकल्प मनात घेऊन निरोप घेतला.




