नाणीज येथे ‘कृषी दिन’ ; चारसूत्री भात लागवड स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान


​रत्नागिरी, दि. १ ): महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून नाणीज ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ‘कृषी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद कृषि विभाग, पंचायत समिती रत्नागिरी, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
​या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे उपस्थित होत्या. तर प्रमुख उपस्थिती म्हणून समाजकल्याण सभापती अ‍ॅड. सुयोग कांबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कृषी विकास अधिकारी अभिजीत गडदे, जिल्हा कृषी अधिकारी विकास मुळीक, पंचायत समिती रत्नागिरी सभापती प्रवीण पांचाळ, गटविकास अधिकारी चेतन शेळके, उपसभापती गजानन धनावडे, नाणीज ग्रामपंचायतीचे प्रशासक विनायक शिवगण, पंचायत समिती सदस्या डॉ. पद्मजा कांबळे व विद्या बोंबले आदी उपस्थित होते.
​’वृक्षदिंडी’ने कार्यक्रमाची सुरुवात व शेतकऱ्यांचा सत्कार
​कार्यक्रमाची सुरुवात श्री धावजेश्वर मंदिर येथे वृक्ष लागवड करून व पारंपरिक पद्धतीने ‘वृक्षदिंडी’ काढून करण्यात आली. त्यानंतर मुख्य सभागृहात दीपप्रज्वलन आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पाहुण्यांचे स्वागत झाले. कृषि विकास अधिकारी श्री गडदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या सोहळ्यात रत्नागिरी तालुक्यातील चारसूत्री भात लागवड पीक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
​तांत्रिक सत्र व मार्गदर्शन
​कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांसाठी विशेष तांत्रिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बदलते हवामान (एल निनो प्रभाव) आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या संकटावर मात करण्यासाठी ‘नैसर्गिक शेती’चे महत्त्व किती गरजेचे आहे, यावर कृषि विज्ञान केंद्र लांजाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद हणमंते यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, डॉ. एम. एम. महाले यांनी कोकणातील प्रमुख पिके असलेल्या भात आणि नाचणीच्या आधुनिक व सुधारित लागवड तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली.
​रोपांचे मोफत वाटप
​कार्यक्रमाच्या सांगतेवेळी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना विविध उपयुक्त रोपांचे मोफत वितरण करण्यात आले. माजी शिक्षक सुशील जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि विस्तार अधिकारी नारायण पवार, अंकुर कांबळे, अक्षय शिंदे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पुरुषोत्तम सुर्वे, ग्राम पंचायत अधिकारी पूर्वा मुद्राळे व नाणीज ग्रामपंचायतीच्या समस्त कर्मचारी वर्गाने उत्तम नियोजन केले होते. या कृषी दिन सोहळ्याला रत्नागिरी तालुक्यातील शेतकरी बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button