​रत्नागिरी पालिकेत ‘सर्वसाधारण’ वादळ; अनधिकृत फलक, अतिक्रमण आणि दोषी ठेकेदारांवर कडक कारवाईचे आदेश!शाळा-कॉलेजेससमोरील धोकादायक होर्डिंग्ज हटवणार;


रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी प्रचंड वादळी ठरली. शहरातील रखडलेले प्रश्न, नागरिकांची सुरक्षा आणि विविध विकासकामांवरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. या सभेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अग्रक्रमाने मांडण्यात आला. शहरातील सर्व शाळा आणि कॉलेजेसच्या परिसरात असलेले मोठे जाहिरात फलक विद्यार्थ्यांच्या जिवासाठी अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे स्पष्ट करत, हे सर्व अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवण्याचा मोठा निर्णय नगराध्यक्षांनी दिला. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी, अशा कडक सूचना यावेळी देण्यात आल्या.
​सभेत फगरवठार येथील पालिकेच्या रस्त्याकडील संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी जोरदार चर्चा झाली. संबंधित ठेकेदाराने पालिकेची कोणतीही परवानगी न घेता खालच्या बाजूला असलेल्या खाजगी जागेत खोदकाम केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे समोर आले. या बेजबाबदारपणाबद्दल संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. तसेच, सदर पडलेली भिंत त्याच ठेकेदाराने स्वतःच्या खर्चाने पुन्हा बांधून द्यावी, अशी आग्रही मागणी नगरसेवकांनी लावून धरली.
​शहरातील भाजी, फळ आणि चिकन विक्रेत्यांच्या अनधिकृत व्यवसायाला चाप लावण्यासाठी पालिकेमार्फत आता विशेष सर्व्हे केला जाणार आहे. विक्रेत्यांकडे पालिकेचे परवाने आहेत की नाही, याची तपासणी केली जाईल. तसेच जे विक्रेते परिसरात गंदगी करतात, त्यांना कडक नोटिसा बजावून आरोग्य सभापतींच्या दालनात त्यांची तातडीने बैठक घेतली जाईल. बाजार फी वसुलीचा मक्ता देताना विक्रेत्यांकडून ८ महिन्यांची रक्कम पूर्ण भरून घ्यावी आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवावी, असे निर्देश पालिकेने दिले आहेत.
​शहरातील वीज खांबांचा व्यावसायिक वापर करणाऱ्या कंपन्यांनाही पालिकेने चांगलाच दणका दिला आहे. पालिकेच्या स्ट्रीट लाईट पोलवर इंटरनेट, डिश टीव्ही आणि केबल कंपन्यांनी विनापरवानगी वायर्स टाकून, पालिकेला कोणताही कर न देता व्यवसाय थाटला असल्याचा मुद्दा नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी मांडला. या कंपन्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे ठरले. तसेच खांबांवर लटकणारे अनधिकृत जाहिरात फलकही तात्काळ हटवण्याचे आदेश नगरसेवक निमेश नायर यांच्या मागणीनंतर देण्यात आले.
​शहरातील जलस्त्रोतांचे संवर्धन करण्यासाठी मालको विहीर, तलाव व इतर दुर्लक्षित जलस्त्रोतांची योग्य साफसफाई करून तिथे सुरक्षेसाठी जाळ्या बसवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. विविध प्रभागांतील उघड्या विहिरींमध्ये उनाड गुरे कोसळण्याच्या घटना घडत असल्याने, विहीर मालकांना सुरक्षिततेसाठी संरक्षक कठडे बांधण्याच्या सूचना देण्याचे नगरसेवकांनी ठरवले. सभेच्या शेवटी प्रभागातील विकासकामांमध्ये दुजाभाव होत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता थेट कामांचे नारळ फोडले जात असल्याचा आणि कामांना बगल दिली जात असल्याचा आरोप करत, सर्व नगरसेवकांना समान न्याय देऊन प्रभागांमध्ये समान वागणूक मिळावी, अशी जोरदार मागणी लोकप्रतिनिधींनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button