
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला ८ आॕगस्टपर्यंत मुदतवाढ; १९ ऑक्टोबरला होणार अंतिम यादी प्रसिद्ध कोकणातील मुसळधार पावसामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय; रत्नागिरी जिल्ह्यात BLO मार्फत गृहभेटी सुरूच
रत्नागिरी, दि. २० )- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यासाठी जाहीर केलेल्या मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६’ अंतर्गत काम पूर्ण करण्यासाठी ८ आॕगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोकण, मुंबई व इतर काही भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे या कामात व्यत्यय निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या विनंतीवरून भारत निवडणूक आयोगाने १५ जुलै २०२६ रोजी सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या १४ मे २०२६ च्या पत्रानुसार ३० जून २०२६ पासून जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याद्वारे मतदारांच्या घरोघरी जाऊन ‘गणना प्रपत्र’ (Enumeration Form) वाटप व संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे सुधारित वेळापत्रकानुसार आता BLO मार्फत गृहभेटींचा कालावधी ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत, निश्चित करण्यात आला आहे. तसेच मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व पुनर्रचना करण्याचे काम ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
यानंतर मतदार याद्यांची प्रारूप प्रसिद्धी सोमवारी, १७ ऑगस्ट २०२६ रोजी केली जाईल. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येतील. तर दाखल झालेले दावे व हरकती निकाली काढणे आणि नोटीस कालावधी १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६ असा असणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या या मुदतवाढीमुळे मतदारांना आपले गणना प्रपत्र भरून देण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध झाला आहे.
त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले ‘गणना प्रपत्र’ मुदतीत भरून आपल्या BLO कडे जमा करावे आणि ही विशेष मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी श्री जिंदल यांनी केले आहे.




