
राजापूर एसटी डेपोसमोरील स्पीड ब्रेकर पुन्हा बसवा! महामार्गावरील वेगवान वाहतुकीमुळे अपघाताचा धोका; महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना कराव्यात – ॲड. जमीर खलिफे
राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर एसटी डेपोसमोर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी यापूर्वी बसविण्यात आलेले स्पीड ब्रेकर पुन्हा काढून टाकण्यात आल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महामार्गावरून होणारी भरधाव वाहतूक आणि एसटी बसची सततची ये-जा लक्षात घेता येथे तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. काढून टाकण्यात आलेले स्पीड ब्रेकर पुन्हा बसवावेत, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा दक्षिण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजापूर नगर परिषदेतील नगरसेवक ॲड. जमीर खलिफे यांनी केली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाली ते लांजा तसेच आंजणारी घाट परिसरात वारंवार अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने काही ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहेत. मात्र, राजापूर एसटी डेपोसमोरील महामार्गावर यापूर्वी बसविण्यात आलेले स्पीड ब्रेकर पुन्हा काढून टाकण्यात आल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने तसेच गोव्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते. अनेक वाहने भरधाव वेगाने ये-जा करीत असल्याने एसटी डेपोसमोरील परिसरात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः एसटी बसची महामार्गावर होणारी ये-जा आणि महामार्गावरील वाहनांचा वेग लक्षात घेता या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
वास्तविक, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावेळीच राजापूर एसटी डेपोसमोर उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारणे अपेक्षित होते. मात्र, महामार्गाचे काम पूर्ण होत असतानाही या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे किमान आता तरी या ठिकाणी दुभाजक (डिव्हायडर) उभारण्यात यावा किंवा यापूर्वी बसविण्यात आलेले स्पीड ब्रेकर पुन्हा बसविण्यात यावेत, अशी मागणी ॲड. खलिफे यांनी केली आहे.
अपघातानंतर जाग येण्यापेक्षा आधीच उपाययोजना करा!
राजापूर एसटी डेपोसमोरील हा प्रश्न गंभीर असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे दुर्लक्ष करू नये. एखादा मोठा अपघात घडून जीवितहानी झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोका लक्षात घेऊन आताच प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणाची पाहणी करून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, असेही ॲड. खलिफे यांनी स्पष्ट केले.
या मागणीसंदर्भात येत्या दोन दिवसांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रत्नागिरी येथील कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.




