
अणुस्कुरा घाटात भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
अणुस्कुरा घाटात बुधवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास भीषण दुचाकी अपघात झाला. या अपघातात निलेश विलास पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त तिघेही बांबवडे येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर मात्र आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार उघड झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला; मात्र तब्बल एक ते दीड तास उलटूनही शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे तसेच डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण प्रशासनाकडून देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, गंभीर जखमींना वेळेत उपचार मिळण्यात अडथळे निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णवाहिका न आल्याने स्थानिकांनी स्वतः पुढाकार घेत जखमींना इतर वाहनांतून उपचारासाठी हलवण्याची व्यवस्था केली.
या घटनेनंतर आपत्कालीन सेवांमधील निष्काळजीपणाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच दुर्गम घाट भागात तातडीची आरोग्य सेवा सक्षम करण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.




